कर्नाटकमधील भाजपचे नेते राष्ट्रीय नेत्यांना भेटणार Print

येड्डियुरप्पांच्या मनधरणीचे प्रयत्न
पीटीआय
बंगळुरू
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा यांनी पक्षत्याग करू नये, यासाठी आता भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते या संदर्भात ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. एस. ईश्वरप्पा यांनी सांगितले.
कर्नाटकमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. येड्डियुरप्पा यांनी पक्षाचा त्याग करू नये यासाठी राष्ट्रीय नेत्यांनी प्रयत्न करावेत, अशी गळ त्यांना घालण्यात येणार आहे, असेही ईश्वरप्पा म्हणाले.
येड्डियुरप्पा यांना प्रदेशाध्यक्ष अथवा मुख्यमंत्री करावे, अशी सूचना राज्यातील नेते राष्ट्रीय नेत्यांना करणार आहेत का, असे विचारले असता ईश्वरप्पा म्हणाले की, येड्डियुरप्पा यांच्यासमवेत शुक्रवारी झालेल्या चर्चेच्या वेळी काही निर्णय घेण्यात आले आहेत.
केंद्रीय नेतृत्वाने येड्डियुरप्पांना प्रदेशाध्यक्ष अथवा मुख्यमंत्री केले तरी ते कर्नाटक भाजपमधील सर्वाना मान्य असेल. कर्नाटक भाजपमध्ये या बाबत कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत, असेही ईश्वरप्पा म्हणाले.

यापूर्वीही येड्डियुरप्पा पक्षत्याग करणार असल्याच्या वावडय़ा उठल्या होत्या. मात्र ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला होता, असेही ईश्वरप्पा म्हणाले.