‘बेकायदा खाणींतून झालेल्या तोटय़ाचा आकडा प्रतिकात्मक’ Print

पी.टी.आय.
पणजी
गेल्या १२ वर्षांत झालेल्या बेकायदा खाणकामांमुळे सरकारला अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांचा झालेला तोटा प्रतिकात्मक असल्याचा निष्कर्ष शाह आयोगाने काढला असल्याचा दावा ‘गोवा मिनरल ओअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन’ ने केला आहे.
गोव्यातील प्रत्येक कायदेशील तसेच बेकायदा खाणींमुळे नक्की किती तोटा झाला, याची वस्तुस्थितीवर आधारित तपासणी तज्ज्ञांमार्फत केली जावी, अशी शिफारस शाह आयोगाने केली होती, असे असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर यांनी सांगितले. भाडेपट्टीवरील खाणींबाहेर झालेल्या अतिक्रमणांची तपासणी आधुनिक अशा ‘थ्रीडी लेझर’ यंत्रणेच्या सहाय्याने करावी आणि ते करताना अन्य घटकही विचारात घेतले जावेत, असे न्यायिक आयोगाने सुचविले होते.
शाह आयोगाने सांगितलेली हानी पूर्णपणे प्रतीकात्मक असून प्रत्यक्षात किती नुकसान झाले आहे किंवा न्या. शाह आयोगाने काय म्हटले आहे, हे कोणीही नीट सांगितलेले नाही, असे साळगावकर म्हणाले. सध्या दररोज आमच्या दिशेने टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्यामुळे ३५ हजार कोटी रुपयांच्या नुकसानीबद्दल आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले.