रिचर्ड ओल्सन अमेरिकेचे पाकिस्तानातील नवे राजदूत Print

पीटीआय
इस्लामाबाद
पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत म्हणून रिचर्ड ओल्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी शनिवारी त्यांचे येथे आगमन झाले. परस्पर आदरभाव आणि समान हितांबाबत दोन्ही देशांमधील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे ओल्सन यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात कामाची सुरुवात करण्यास आपण उत्सुक आहोत, राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांची लवकरच भेट घेतल्यानंतर पाकिस्तानातील सर्व समाजाला बरोबर घेऊन दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध प्रस्थापित होतील यासाठी आपण काम करू, असे ओल्सन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानात गुणवत्ता ठासून भरलेली असून या देशातील जनतेसमवेत आपल्याला काम करावयाचे आहे. आर्थिक संधी वाढविणे, दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धिंगत करणे, वीजटंचाईवर मात करणे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणे यासाठी आपण काम करण्यास उत्सुक आहोत, असेही ते म्हणाले.
यापूर्वी ओल्सन यांनी काबूलमधील अमेरिकेच्या दूतावासात विकास आणि आर्थिक व्यवहार समन्वयक संचालक आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.