भारतीय कंपन्यांमुळे अमेरिकेत रोजगारनिर्मिती Print

५० हजार नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती
पीटीआय
वॉशिंग्टन
आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अमेरिकेत सध्या बेरोजगारी ही मोठी समस्या आह़े  अशा वेळी भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत मोठय़ाप्रमाणात गुंतवणूक करून सुमारे ५० हजार नोकऱ्यांची निर्मिती केली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री विल्यम बर्न यांनी शुक्रवारी येथे दिली़
भारत आणि अमेरिकेचे आर्थिक नाते दुहेरी आह़े  दोन्ही राष्ट्रे आपापल्या देशात अधिकाधिक गुंतवणूक आणि विकास व्हावा, यावर भर देत असतात़  असे असले तरीही, ओहाओ येथील टाटा या भारतीय फॅक्टरीने हजारो अमेरिकी नागरिकांना कामावर ठेवून घेतले असतानाही, अमेरिकी लघु, मध्यम आणि मोठय़ाही उद्योगपतींची भारतातील स्थिती मात्र डळमळीत आह़े  तरीही भारताच्या संपन्नतेला साहाय्य व्हावे यासाठी आमच्या कंपन्यांची चांगले तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ पुरविण्याची सिद्धता आह़े  मात्र, त्यासाठी भारत शासनाने विकासास अनुकूल वातावरण तयार करून द्यावे, असेही ते म्हणाल़े
भारत २०२५ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचे बोलले जात आह़े  मात्र ९० टक्के भारत आजही ब्रॉडबॅण्डविनाच आह़े  तसेच २०३० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या बांधकामापैकी ८० टक्के बांधकाम अद्याप झालेले नाही़  मॅकेन्झी अहवालानुसार, भारत येत्या पंचवार्षिक योजनेत एक पद्म डॉलर केवळ बांधकामावर खर्च करणार आहे, असे टीकात्मक म्हणणेही बर्न यांनी मांडल़े  किरकोळ बाजारातील थेट परकीय गुंतवणुकीला भारताने दिलेल्या परवानगीचे त्यांनी यावेळी कौतुक केल़े