ओबामा-रोम्नी यांच्यात ‘काँटे की टक्कर’ Print

लोकप्रियतेबाबत मात्र रोम्नींची किंचित सरशी

पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा व त्यांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिट रोम्नी यांच्यातील लढत अधिकच तीव्र होत चालली आहे. रोम्नी अद्याप ओबामांपेक्षा किंचित सरस असल्याचेच एकंदर पाहण्यांवरून दिसून येत असले तरी उभयतांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणेच अपेक्षित असल्याचे एकमत आहे.
अध्यक्षपदाची खुर्ची सलग दुसऱ्यांदा टिकवण्यासाठी उत्सुक असलेल्या ओबामांपेक्षा रिपब्लिकन उमेदवार रोम्नी किंचित सरस असल्याचे गॅलप या निवडणूक सर्वेक्षण संस्थेचे म्हणणे आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत रोम्नी पाच अंकांनी ओबामांपेक्षा पुढे असल्याचे या संस्थेचे निरीक्षण आहे. तर रिअलक्लिअर पॉलिटिक्स या संस्थेने मात्र ओबामा आणि रोम्नी यांच्यात केवळ ०.९ टक्क्य़ांचाच फरक असल्याचे मत नोंदवले आहे. वॉशिंग्टन पोस्ट आणि एबीसी यांनी मात्र रोम्नी एका गुणानेच ओबामांच्या पुढे असल्याचे म्हटले आहे. रोम्नींना पाठीमागे टाकण्यासाठी ओबामांची आता सारी मदार ओहायो राज्यावर आहे. या राज्यात सध्या ओबामा आघाडीवर असून राज्यभरात एकंदर १८ मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी ओबामांचे प्राबल्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे येथे आघाडी मिळाली तर ती ओबामांसाठी निर्णायक ठरेल असे या दोन्ही वृत्तपत्रांचे म्हणणे आहे.
माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचे काम केलेले मार्क मॅककिनॉन यांनी मात्र ओबामा- रोम्नी यांना अध्यक्षपदाची समसमान संधी असल्याचे मत नोंदवले आहे.
ब्रुकिंग्ज संस्थेतील निवडणूक विश्लेषक विल्यम गॅल्स्टन यांनी तर उद्याच मतदान झाले तर नेमके कोण अध्यक्षपदी येईल हे सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे.