तरूण रक्ताला वाव देण्यासाठीच मंत्रिपदाचा राजीनामा -कृष्णा Print

पीटीआय

नवी दिल्ली
‘‘तरूण रक्ताला वाव देण्यासाठी योग्य वेळ आली असल्याने आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी, कर्नाटकातील राजकारणात भूमिका पार पाडण्याचा आपला पर्याय खुला आहे,’’ असे माजी परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी सांगितले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की,तरूणांनी जबाबदारी स्वीकारावी अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तरूण रक्ताला वाव मिळण्यासाठी आपण राजीनामा दिला असून या निर्णयाचे सर्वसाधारणपणे स्वागतच झाले आहे. राजीनामा देण्याचा निर्णय स्वत:चा होता की पंतप्रधानांचा, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो आतून आलेला निर्णय होता, त्यात आपल्या पत्नीने मोठी भूमिका पार पाडली आहे. तरूण रक्ताला वाव देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे आपल्या अनुभवाचे महत्त्व कमी होते असे आपण मानत नाही. अनुभव महत्त्वाचाच असतो, विशेषत: परराष्ट्र संबंध हा विषय बघितला तर त्यात कमालीची सहनशीलता लागते तसेच जिद्द व चिकाटी लागते.
कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यात भूमिका पार पाडणार काय असे विचारले असता ते म्हणाले की, तरूण नेतृत्व करतील व आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रगती करण्यास मदत करू.  परराष्ट्र मंत्री म्हणून फार कमी काळ काम करायला मिळाले या टिप्पणीवर त्यांनी सांगितले की, तो पुरेसा काळ होता.