संघ हा गडकरींचा ‘गॉडफादर’ नाही Print

सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची स्पष्टोक्ती
पीटीआय/पाटणा, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

रा.स्व.संघ हा भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचा गॉडफादर आहे, अशा आशयाच्या बातम्यांचा संघाने इन्कार केला असून भ्रष्टाचाराचे आरोप झाले असताना आता गडकरी यांचे भवितव्य हे भाजपच ठरवणार आहे असे स्पष्ट केले आहे. केवळ आरोपांच्या आधारे गडकरी यांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये असे रा.स्व. संघाने सूचित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी सांगितले, की तुम्ही म्हणता तसे नाही, रा.स्व.संघ हा गडकरींचा गॉडफादर नाही व त्यांचे भवितव्य भाजपच ठरवणार आहे.

गडकरी यांनी राजीनामा द्यावा काय असे विचारले असता ते म्हणाले, की ती काळजी भाजपने करायची आहे तो आमचा विषय नाही. ती भाजपची अंतर्गत बाब आहे, त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय हा भाजपने घ्यायचा आहे तथापि केवळ काही आरोप झाले म्हणून गडकरी यांनी राजीनामा द्यावा असे वाटत नाही. केवळ आरोपांच्या आधारे राजीनामा द्यावा हे आपल्याला मान्य नाही. या प्रकरणी चौकशी पूर्ण होऊ द्या, सत्य असेल ते बाहेर येईल. गडकरी यांनी स्वत:हून आरोपांची चौकशी करण्यास सांगितले असून कायदा आपले काम करील असे म्हटले आहे. गडकरी व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी-माजी पक्षाध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना रा.स्व.संघ वेगळ्या मोजपट्टय़ा लावत आहे, या आरोपाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, की हा रा.स्व.संघाचा विषय नाही. त्याचे उत्तर गडकरी व भाजपच देऊ शकेल.
भाजप व रा.स्व संघ यांचे नेमके संबंध काय आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, त्या वेगवेगळ्या संस्था आहेत. गडकरी यांच्या पूर्ती समूहात रा.स्व.संघाची पाश्र्वभूमी असलेले लोक सामील आहेत याविषयी विचारले असता ते म्हणाले, की रा.स्व.संघाशी संबंध असलेले लोक कुठेही असू शकतात. याचा अर्थ संघाने त्याची काळजी करावी असे काही नाही.