ओबामा आणि रोम्नी यांची मते खाण्यासाठी दोन उमेदवार सज्ज Print

पीटीआय
वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत बराक ओबामा आणि मिट रोम्नी यांच्यात चुरशीची लढत होणार असली तरी आणखी दोन उमेदवार ओबामा आणि रोम्नी यांच्या वाटय़ाची लक्षणीय मते खाण्याची शक्यता येथील माध्यमांनी वर्तवली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची ही निवडणूक ६ नोव्हेंबरला होत असून डेमॉक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा आणि रिपब्लिकन पक्षाचे मिट रोम्नी यांच्यात खरी लढत होणार आहे. ओबामा यांच्यापुढे अध्यक्षपद टिकवण्याचे आव्हान असून त्यांनी जनमत चाचणीत रोम्नी यांच्यावर काही प्रमाणात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मात्र लिबर्टेरियन पक्षाचे गॅरी जॉन्सन आणि कॉन्स्टिटय़ूशन पक्षाचे व्हर्जील गुडी हे अन्य उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत असून ते ओबामा आणि रोम्नी यांची हजारो मते खातील, तसेच ओबामा आणि रोम्नी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित असल्याने या जॉन्सन आणि गुडी यांच्या पारडय़ात पडणाऱ्या मतांवर मुख्य उमेदवारांपैकी एकाचे भवितव्य अवलंबून असेल, असे सीएनएनने म्हटले आहे. गुडी यांचा व्हर्जिनियामध्ये दबदबा असून १९९६ पासून २००८पर्यंतची प्रत्येक निवडणूक ते मोठय़ा फरकाने जिंकले आहेत. येत्या निवडणुकीतही त्यांना चांगला जनाधार मिळाला तर ओबामांसाठी ती डोकेदुखी ठरू शकेल. दुसरीकडे न्यू मेक्सिकोचे माजी राज्यपाल असणाऱ्या जॉन्सन यांचा कोलॅरॅडो, नेवाडा आणि हँपशायरमध्ये दबदबा असून त्यामुळे रोम्नी यांना तेथे फटका बसू शकेल. या दोन्ही उमेदवारांची निवडणूक जिंकण्याची सुतराम शक्यता नसली तरी त्यांना जेवढी जास्त मते मिळतील, तेवढय़ा प्रमाणात ओबामा आणि रोम्नी यांचे मताधिक्य घटणार आहे.
रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे प्रमुख रिएन्स प्रायबस यांनी मात्र सीएनएनने वर्तवलेली ही शक्यता खोडून काढली आहे. ही निवडणूक अमेरिकेच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाची असून कोणाच्याही पारडय़ात मते टाकण्याएवढे मतदार मूर्ख नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

‘न्यू यॉर्क टाइम्स’ ओबामांच्या पाठीशी
अमेरिकेतील आघाडीचे आणि प्रतिष्ठित वृत्तपत्र न्यू यॉर्क टाइम्सने सलग दुसऱ्यांदा बराक ओबामा यांची पाठराखण केली आहे. या निवडणुकीत ओबामा यांचा विजय होईल आणि अमेरिकेसाठी आवश्यक असणाऱ्या धोरणांना त्यांच्या नेतृत्वाखालील महासभा प्राधान्य देईल, असे या वृत्तपत्राच्या संपादकीयात म्हटले आहे. जागतिक मंदीच्या तडाख्यातून अमेरिकेला बाहेर काढणे, अल कायदासारख्या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणे आणि सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे, ही ओबामा यांनी केलेली महत्त्वाची कामे आहेत, याचा यात आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.

‘द डे मॉइन्स रजिस्टर’चा रोम्नींना पाठिंबा
ओबामा आणि रोम्नी यांच्या लढतीत निर्णायक ठरणाऱ्या लोवा राज्यातील ‘द डे मॉइन्स रजिस्टर’ या दैनिकाने मिट रोम्नी यांना पाठिंबा देऊन ओबामा यांना झटका दिला आहे. गेली ४० वर्षे डेमॉक्रॅटिक पार्टीला पाठिंबा देणाऱ्या या वृत्तपत्राने गेल्या वेळी ओबामा यांना पाठिंबा दिला होता, या वेळी मात्र त्यांनी आपले दान रोम्नी यांच्या पारडय़ात टाकले आहे. या दैनिकाच्या संपादकीयात ओबामा आणि रोम्नी या दोघांचेही कौतुक करण्यात आले आहे, मात्र अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सर्वशक्तिमान करण्याची क्षमता केवळ रोम्नी यांच्यात आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.