ऑस्ट्रेलियाच्या आशिया धोरणात हिंदी, मँडरिन भाषांच्या प्रशिक्षणावर भर Print

पीटीआय
मेलबर्न, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

आशियाचा उदय हा न थांबवता येण्यासारखा आहे असे जाहीर करून ऑस्ट्रेलियाने भारत व चीन या महत्त्वाच्या देशांशी संबंध आणखी बळकट करण्यासाठी त्यांच्या शाळांमध्ये हिंदी व मँडरिन या भाषा शिकवण्याचे ठरवले आहे. ऑस्ट्रेलिया बदलतो आहे तसाच आशियाही बदलतो आहे. या शतकात आशिया हा जागतिक नेतृत्वात केंद्रस्थानी येणार आहे, आशियाचा उदय होणार आहे असे पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी आज सांगितले. गिलार्ड यांनी अलीकडेच त्यांचा पहिला भारत दौरा केला होता. आशियाचा उदय आता कोणी रोखू शकत नाही, त्याला वेग आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

आशियन सेंच्युरी व्हाइट पेपरचा आराखडा जाहीर करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की आशियातील देशांशी संबंध आणखी सुधारण्यासाठी आशियाविषयक धोरण तयार केले आहे. त्याचा फायदा २०२५पर्यंत ऑस्ट्रेलियाला सर्वात श्रीमंत अशा दहा देशांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याकरिता होईल.
ऑस्ट्रेलियाला आशियात यशस्वी व्हायचे असेल तर त्याची सुरूवात शाळा, प्रशिक्षण गृहे व व्याख्यान केंद्रांपासून करावी लागेल व ऑस्ट्रेलियातील शाळांना आता आशियातील शाळांच्या सहकार्याने मँडरिन, हिंदी, इंडोनेशियन व जपानी भाषा मुलांना शिकवण्याची व्यवस्था करावी लागेल. आमची सर्व देशांशी मैत्री आहे.
अमेरिका, चीन, इंडोनेशिया, भारत व कोरिया यांना त्यात प्राधान्य आहे. आशिया हे २०२५ पर्यंत बहुतांश मध्यमवर्गीयांचे घर असणार आहे, ऑस्ट्रेलियासाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आशियाबरोबरच्या आर्थिक संबंधांबाबत बदल करण्याची गरज आहे.