शीख दंगल ही ‘सामूहिक हत्याकांड’च Print

ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेंटमध्ये मांडला जाणार प्रस्ताव
पीटीआय, मेलबर्न
१९८४ मध्ये भारतात झालेली शीखविरोधी दंगल म्हणजे धार्मिक हिंसाचाराचे क्रूर उदाहरण आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातील या हिंसाचाराला ‘सामूहिक हत्याकांड’ घोषित करावे,अशी मागणी करणारा प्रस्ताव ऑस्टेलियाच्या एका खासदाराने या आठवडय़ात संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार वॉरेन एंटेस्च यांनी सांगितले की, भारतात नोव्हेंबर १९८४ रोजी झालेल्या शीख हत्याकांडाची जखम अद्याप शीख समाजाच्या मनात ताजी आहे. देशात शीख समुदायाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे आपण या मुद्दय़ाला ऑस्ट्रेलियाच्या संसदेत उचलून धरण्याचा निर्णय घेतला आहे. कारण १९८४ साली झालेला नरसंहार धार्मिक िहसाचाराचे एक क्रूर उदाहरण असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. वॉरेन मांडणाऱ्या प्रस्तावावर १ नोव्हेंबर रोजी संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
१९८४ साली झालेल्या शीख दंगलीचा मुद्दा कैर्न्‍स येथील रहिवासी दलजित सिंग या व्यक्तीने प्रथम उपस्थित केला होता. समानता आणि मानवजातीसाठी शांतीची मनोकामना करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या मुद्दय़ाला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणे असाच त्याचा अर्थ होतो, असेही सिंग यांनी म्हटले आहे.