रेड्डी ‘रेडी’ नव्हते! Print

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय काढून घेतल्यामुळे नाराज झालेले एस. जयपाल रेड्डी यांनी सकाळऐवजी उशीरा सायंकाळी अनिच्छेनेच विज्ञान व तंत्रज्ञान खात्याची सूत्रे स्वीकारली. प्रथेनुसार नव्या पेट्रोलियम मंत्र्यांना मावळत्या मंत्र्याने सूत्रे द्यायची असतात पण सकाळी नवे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली कार्यालयात आले तेव्हा रेड्डी फिरकले नाहीत! स्वतच्या खात्याची सूत्रे घ्यायलाही ते गेले नाहीत. त्यामुळे तर्कवितर्काना उधाण आले होते. सायंकाळी मात्र सूत्रे स्वीकारून रेड्डींनी वादाला विराम द्यायचा प्रयत्न केला.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दबावाखाली रेड्डी यांच्याकडून पेट्रोलियम खाते काढून घेतल्याचा आरोप होत आहे. रेड्डी यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळाली, अशी टीका अरिवद केजरीवाल यांनी केली. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयातून हलविण्यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्याला विश्वासात घेतल्याचे तसेच हे मंत्रालय गमावल्याचा आपल्याला मुळीच खेद होत नसल्याचे स्पष्ट करीत रेड्डी यांनी संध्याकाळी या वादाला विराम देण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी सकाळी शास्त्री भवनात नवे पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडे सूत्रे सोपविण्याच्या औपचारिकतेकडे पाठ फिरवून रेड्डी यांनी आपली नाराजी प्रथम व्यक्त केली. पेट्रोलियम मंत्रालयाचे मावळते राज्यमंत्री आर.पी.एन. सिंह यांना मोईलींना सूत्रे सोपवावी लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेड्डी यांना भेटण्यासाठी मोईली दुपारी त्यांच्या घरी गेले. रेड्डी यांनी पेट्रोलियम मंत्रालयात भरीव काम केले असल्याची प्रशंसाही त्यांनी केली. नंतर सायंकाळी रेड्डी यांनी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची सूत्रे घेतली. नाराजी लपवून त्यांनी पत्रकारांशी हास्यविनोद केला. पंतप्रधानांशी आपले संबंध नेहमीच सौहार्दाचे आणि उत्तम राहिल्याचे सांगून मंत्रालय बदलण्यापूर्वी त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले होते, असे आवर्जून सांगितले. पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि सच्चा मंत्री म्हणून काम करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहिला, असे रेड्डी म्हणाले.