इंटरनेट विस्तारात भारत आघाडीवर Print

पीटीआय, नवी दिल्ली

इंटरनेट वापराचा प्रसार वेगाने होणाऱ्या पहिल्या तीन देशांत भारताचा समावेश आहे, अशी माहिती अ‍ॅसोकॅम आणि कॉमस्कोर या औद्योगिक संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. भारतामध्ये इंटरनेट विस्ताराचा वार्षिक वेग हा ४१ टक्के असून ब्रिक देशात (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतामध्ये मागील वर्षभरात १ कोटी ८० लाख नव्या इंटरनेटधारकांची भर पडली असून, त्यामुळे देशातील इंटरनेटधारकांची संख्या १२ कोटी ५० लाख इतकी झाली आहे. तर चीनमधील इंटरनेटधारकांची संख्या १ कोटी ४० लाख इतकी वाढली असून त्यामुळे ३३ कोटी ६० लाख चिनी नागरिक आता ‘नेट’कर बनले आहेत, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.  
भारतामध्ये इंटरनेटचा वापर करणारे सरासरी वयही सर्वात कमी आहे. देशातील ७५ टक्के इंटरनेटधारक हे १५ ते ३४ वयोगटातील आहेत, अशी माहिती अ‍ॅसकॉमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी दिली.
१५ ते २४ वयोगटामध्ये इंटरनेटचा प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे. या वयोगटामधील तरुण व तरुणींनध्ये इंटरनेटचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. देशातील इंटरनेटधारकांमधील महिलांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. सोशल नेटवर्किंग, पोर्टल्स, शोध (सर्च), मनोरंजन व बातमीविषयक संकेतस्थळे हे पाच प्रकार इंटरनेटधारकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. आगामी काही वर्षांतही हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता असल्याचे [डी. एस. रावत यांनी स्पष्ट केले.
प्रवास करण्याच्या उद्देशाने इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाणही (ऑनलाइन ट्रॅव्हल) देशात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. एअरलाइन्स, हॉटेल, ट्रॅव्हल एजंट यांच्या संकेतस्थळाचा वापर करण्याच्या संख्येत वाढ होत असून देशातील पाचपैकी एक इंटरनेटधारक भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट देत असतो, असे रावत यांनी स्पष्ट केले.
देशातील नेटकरांमध्ये खरेदी करण्यासाठीही संकेतस्थळाचा वापर करण्याचा कलही वेगाने वाढत आहे. मागील महिनाभरात ३ कोटी ७५ लाख इंटरनेटधारकांनी या विषयातील संकेतस्थळांना भेट दिली, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे. यामधील १३ टक्के नेटकरांनी कपडे खरेदीसाठी इंटरनेटचा वापर केला. एप्रिल ते जून २०१२ दरम्यान ३१ कोटी अमेरिकी डॉलर्स रकमेचा व्यवहार देशातील इंटरनेटधारकांनी केला. ऑनलाइन खरेदीवरील ग्राहकांचा विश्वास वाढत असल्यामुळे आगामी काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.