मक्केसाठी ५६५० किमीची पायपीट! Print

पीटीआय, मॉस्को

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण जिवाचे रान करतो, मग ती असाध्य गोष्टदेखील साध्य होते. कोणत्याही परिस्थितीत अल्लाच्या दरबारी जायचेच, असा निर्धार केलेल्या एका भाविकानेही अशीच अचाट गोष्ट करून दाखवली आहे. हाडे गोठवणारी थंडी आणि सीरियातील जिवावर बेतणाऱ्या संकटांना झुगारत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भक्तीच्या जोरावर या भाविकाने तब्बल ५ हजार ६५० कि.मी. अंतर १० महिन्यांत पायी चालून येथील हज तीर्थस्थान गाठले. सेनाद हादजिक (४७) असे या बोस्नियन मुस्लीम भाविकाचे नाव आहे.
सेनादने मुस्लिमांचे पवित्र स्थान असलेल्या सौदी अरेबियातील मक्का गाठण्यासाठी १० महिन्यांपूर्वी पायी चालण्यास सुरुवात केली. गेल्या डिसेंबरमध्ये बोस्नियातील बानोविची शहरातून प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सेनादकडे केवळ २६० डॉलर आणि पाठीवर २० किलो वजनाची बॅग एवढे सामान होते. सेनादने केवळ सर्बिया, बल्गेरिया, तुर्कस्थान, जॉर्डनच नव्हे तर हिंसाचाराच्या झळांनी  वेढलेल्या सीरियातूनही पायपीट केली. हा प्रवास सोपा नव्हताच. ३१४ दिवसांच्या पायपीटीदरम्यान आपण अनेक संकटांना सामोरे गेलो. त्यामध्ये बल्गेरियातील हाडे गोठवणारी उणे ३६ डिग्री तापमान तसेच हिंसाचारग्रस्त सीरियातील जीवघेणा प्रवास करीत अल्लाच्या दरबारी आल्याचे काही दिवसांपूर्वीच सौदीला पोहोचलेल्या सेनादने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
िहसाचारग्रस्त सीरियातून पायपीट करताना कधी लष्कराशी तर कधी बंडखोरांशी वाटाघाटी करून मार्गक्रमण करावे लागले. एका सीरियाच्या सैनिकाने आपण वाचल्यास आपल्यासाठी अल्लाच्या दरबारी प्रार्थना करण्याची विनंती केल्याचेही सेनादने सांगितले.
दरम्यान, मुस्लीम बांधवांसाठी हजची यात्रा अतिशय पवित्र मानली जाते. जीवनात एकदा तरी मक्केला जाण्याची संधी मिळावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधव करीत असतात.