‘ड्रॅगन’ सुरक्षितपणे पृथ्वीवर परत Print

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

पहिलावहिला व्यावसायिक पेलोड आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात नेऊन सोडण्यात स्पेसएक्सची ड्रॅगन ही कॅप्सूल (अंतराळ कुपी) यशस्वी ठरली असून आता ती पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आली आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे १२ वाजून ५२ मिनिटांनी ही स्पेस एक्सची ड्रॅगन कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीने पॅसिफिकमध्ये उतरली. अठरा दिवसांची मोहीम फत्ते करून परतलेल्या या कुपीने हार्डवेअर, काही जीवनावश्यक वस्तू, वैज्ञानिक उपकरणे असलेला ग्लेशियर फ्रीझर असे सगळे सामान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेऊन पोहोचवले.
ही कुपी पॅसिफिक महासागरात सुरक्षित उतरली नंतर सागरात पोहता येणाऱ्या काही व्यक्तींचा खास चमू आता ही कुपी माघारी आणत आहे, असे अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने म्हटले आहे.
स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी एलन मस्क यांनी सांगितले की, ही ऐतिहासिक अशी मोहीम होती. अंतराळस्थानकात सामान व इतर वस्तू पोहोचवून परत येण्याची जोखमीची कृती या स्पेस कॅप्सूलने यशस्वीपणे केली आहे. स्पेस एक्स कंपनीचा नासाशी करार असून त्याअंतर्गत त्यांनी ही सेवा दिली आहे. त्यात स्पेस एक्सकडे असलेल्या तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. स्पेस एक्सला नासाने १.६ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले असून त्यात बारा मोहिमा होणार आहेत. त्यातील ही पहिली मोहीम होती. अमेरिकेने सध्या अंतराळ उद्योगाचे खासगीकरण सुरू केले आहे त्याचा हा भाग आहे.
या कॅप्सूलने ४५० किलो सामान अंतराळ स्थानकात नेले व येताना ७५८ किलो सामान परत आणले आहे. त्यात हार्डवेअर व उपकरणे यांचा समावेश आहे. ड्रॅगन कुपीने काही नमुने संशोधनासाठी अंतराळ स्थानकात नेले आहेत व काही तेथून परत आणले आहेत. आता स्पेस एक्सचे एक पथक ड्रॅगन कुपी बोटीने लॉसएंजल्स बंदराकडे घेऊन येत आहेत. सीआरएस-१ नावाची ही मोहीम ७ ऑक्टोबरला सुरू झाली त्यात फाल्कन -९ या अग्निबाणाने ड्रॅगन ही कुपी केप कॅनव्हरॉल हवाई दल स्थानकावरून सोडण्यात आली होती.    
अंतराळकुपी- ड्रॅगन
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उपकरणे व इतर सामान पोहोचवण्याचे वाहन.
स्पेस एक्स व नासा यांच्यात करार, अंतराळ उद्योगाचे खासगीकरण.
साडेचारशे किलो सामान स्थानकात नेले व ७५० किलो परत आणले.
पॅसिफिक महासागरात पॅराशूटने यशस्वीरीत्या अवतरण