‘सॅण्डी’मुळे अमेरिकेचा जीव टांगणीला Print

पीटीआय, न्यू यॉर्क

अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावर सोमवारी उशिरा अथवा मंगळवारी सकाळी विनाशकारी सॅण्डी वादळ धडकण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवल्याने पूर्ण अमेरिकेत घबराट पसरली आहे. अतिशय शक्तिशाली असणाऱ्या या वादळामुळे समुद्रात ११ फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने अमेरिकेतील सर्वाधिक दाट लोकसंख्या असणाऱ्या न्यूयॉर्क, बोस्टन आणि न्यू जर्सीसारख्या किनारपट्टीलगतच्या शहरांना त्याचा मोठा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत. न्यूयॉर्क किनारपट्टीपासून सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर हे वादळ घोंघावत असून ते ताशी २३ किलोमीटर वेगाने किनाऱ्याकडे सरकत आहे.

या वादळामुळे होणारा विध्वंस लक्षात घेऊन प्रशासनाने येथे आणीबाणी जाहीर केली आहे. लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. येथील शाळा, महाविद्यालये, शेअर बाजार, सरकारी कार्यालये बंद असून अनेक ठिकाणची भूमिगत रेल्वेसेवाही खंडित आहे. नागरिकांनी मोठी खरेदी केल्याने मॉल व दुकाने रिकामी झाल्याचे दिसत आहेत.  
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सहा नोव्हेंबर या दिवशी होत असून ईशान्येकडील हा भाग बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मिट रोम्नी यांच्यासाठी प्रचाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु वादळाची शक्यता लक्षात घेऊन या दोघांनीही आपापले प्रचारदौरे रद्द केले आहेत.
सॅण्डीची तीव्रता भयंकर असून त्याला कमी लेखू नका, गांभीर्याने वागा, स्थानिक प्रशासनाने तुमच्यासाठी आखलेल्या योजनेस सहकार्य करा, असे आवाहन अध्यक्ष बराक ओबामा यांनी नागरिकांना केले आहे.