पेंग्विन आणि रँडम हाऊस विलीन Print

वृत्तसंस्था, लंडन

इंग्रजी ग्रंथव्यवहारातील पेंग्विन आणि रँडम हाऊस या जगातील अत्यंत आघाडीच्या अशा प्रकाशनसंस्थांनी सोमवारी विलीनीकरणाची घोषणा केली. तब्बल २.४ अब्ज पौंडाच्या विलीनीकरण करारावर पेंग्विनची मालकी असलेल्या पीअरसन प्रकाशनगृह आणि रँडम हाऊसची मालकी असलेल्या बर्टल्समन कंपनीने स्वाक्षऱ्या केल्या असून त्यायोगे नव्याने स्थापन होणारी ‘पेंग्विन रँडम हाऊस’ ही जगातील सर्वात बलाढय़ प्रकाशनसंस्था ठरणार आहे. या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या झाल्या असल्या तरी हे विलीनीकरण प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया पुढील वर्षांच्या उत्तरार्धात पूर्ण होईल आणि ही नवी संस्था पूर्ण ताकदीनिशी ग्रंथव्यवहारात उतरेल, असे सांगण्यात आले.
बर्टल्समन ही जर्मनीतील आघाडीची माध्यमकंपनी असून नव्या कंपनीत तिचा वाटा ५३ टक्के तर पेंग्विनचा वाटा ४७ टक्के राहाणार आहे. नव्या कंपनीच्या संचालकमंडळावर पेंग्विनचे चार तर रँडम हाऊसचे पाच प्रतिनिधी असतील. पेंग्विनचे सध्याचे अध्यक्ष जॉन मॅकिन्सन हे नव्या कंपनीच्या अध्यक्षपदी असतील.  मार्कस डोएल हे सध्या रँडम हाऊसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नव्या कंपनीत त्यांचे हे पद कायम राहील.
हार्पर कॉलीन्स या प्रकाशनसंस्थेची मालकी असलेले न्यूजकॉर्पचे रूपर्ट मरडॉक् हे पेंग्विनवर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर पेंग्विन आणि रँडम हाऊसमध्ये ही अनपेक्षित युती झाली आहे.
२०११ मध्ये रँडम हाऊसचा महसूल एक अब्जच्या पुढे होता तर नफा १८ कोटी युरोच्या घरात होता. त्याच वर्षी पेंग्विनचा महसूल एक अब्ज पौंडाच्या घरात होता.
रँडम हाऊस ही अमेरिका आणि ब्रिटनमधील आघाडीवरील प्रकाशनसंस्था आहे. पेंग्विन हा प्रकाशनविश्वातला सर्वात प्रसिद्ध असा ‘ब्रॅण्ड’ ठरला आहे. विकसनशील देशांतही पेंग्विनचा पसारा वेगाने वाढत आहे. या विलीनीकरणामुळे प्रकाशन व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव, कौशल्य आणि ज्ञानाचाच संगम होत आहे, असे रँडम हाऊसचे मार्कस डोएल यांनी सांगितले.    
असे होणार विलीनीकरण
विलीनीकरण करार २.४ अब्ज पौंडांचा.
नव्या प्रकाशनसंस्थेचे नाव ‘पेंग्विन रँडम हाऊस’.
रँडम हाऊसचा वाटा ५३ टक्के तर पेंग्विनचा ४७ टक्के.
संचालक मंडळात पाचजण रँडमचे तर चौघे पेंग्विनचे.
दोन्ही कंपन्या पुढील तीन वर्षांत आपल्याकडील समभाग विकणार नाहीत.
विलीनीकरण प्रक्रिया पुढील वर्षांच्या उत्तरार्धात पूर्ण होणार.