बंगळुरूमध्ये बर्ड फ्लू? Print

पीटीआय, बंगळुरू
येथून जवळच असलेल्या हेसारगट्टामधील ‘सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (सीपीडीओ) येथे २०६ कोंबडय़ा व १७ बदकांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भागात दोन दिवसांपूर्वीच ३ हजार ६०० टर्कीचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ कोंबडय़ाही मोठय़ा प्रमाणात दगावल्याने बर्ड फ्लूचा विषाणू शहरात पसरल्याची शक्यता आहे.
मृत्युमुखी पडलेल्या कोंबडय़ा बदकांचे नमुने तपासणीसाठी भोपाळमधील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची  माहिती सीपीडीओचे संचालक अर्वीन जन्नू यांनी दिली. टर्कीच्या मृत्यूचीही केंद्र सरकारने दखल घेतली असून त्यांच्या शेड्सच्या र्निजतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याचे जन्नू यांनी सांगितले.     
हेसारगट्टामधील ‘सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (सीपीडीओ) मध्ये पसरलेल्या एचफाइव्ह एनवन विषाणूंची  गंभीर दखल घेतली आहे. या केंद्रातील १९ हजार कोंबडय़ा आणि १३ हजार ३०० इमू पक्ष्यांची खबरदारीचा उपाय म्हणून कत्तल करण्यात येणार आहे.