नकोशा दूरध्वनी आणि एसएमएसने दळणवळण मंत्रीही त्रासले Print

पीटीआय, नवी दिल्ली
नको असणारे दूरध्वनी आणि संदेश ही आता केवळ सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी राहिलेली नाही, तर दळणवळण मंत्री कपिल सिब्बल यांनाही आता या प्रकारांचा जाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता या बाबत त्यांनी दळणवळण नियामकाकडे या प्रश्नाची तड लावण्याचे ठरविले आहे.
नको असणारे दूरध्वनी आणि संदेश या बाबतचा प्रश्न ‘ट्राय’ने हाती घेतला आहे. आपल्यालाही त्याचा जाच सहन करावा लागला आहे. दर दोन मिनिटांनी आपल्याला नको असलेले एसएमएस येतात, असे सिब्बल यांनी येथे जागतिक पातळीवरील सायबर सुरक्षा शिखर परिषदेच्या वेळी वार्ताहरांना सांगितले.
अशा प्रकारचे एसएमएस पाठविण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय सव्‍‌र्हरचा वापर होऊ लागला आहे, मात्र हे प्रकारही थांबलेच पाहिजेत. त्यासाठी आपण ट्रायच्या अध्यक्षांना भेटलो आहोत. यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याची ते काळजी घेतील, असेही सिब्बल म्हणाले.
दरम्यान, दुसऱ्या एका कार्यक्रमात ट्रायचे अध्यक्ष राहुल कुल्लर यांनी, याबाबत ५ नोव्हेंबपर्यंत परिस्थितीत बदल झालेला पाहावयास मिळेल, असे सूचित केले. नको असलेले दूरध्वनी आणि एसएमएस यांना आळा घालण्यासंदर्भातील नियम अधिक बळकट करण्यासाठी ट्रायने एक पत्रिका जारी केली असून त्याबाबत जनमत मागविण्यात येणार आहे.
एखाद्याने १० पेक्षा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा स्रोत रद्द करण्याचे ‘टेलिकॉम कमर्शिअल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स (१० वी सुधारणा) रेग्युलेशन २०१२’च्या मसुद्यात प्रस्तावित करण्यात आले आहे.
सिम कार्ड खरेदीच्या वेळी ऑपरेटरला ग्राहकांकडून त्या सिम कार्डचा वापर मार्केटिंगसाठी करण्यात येणार नाही, अशा आशयाचे पत्र घेण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.