केजरीवाल हे ब्लॅकमेलर Print

भाजपच्या ‘कमल संदेश’मधून टीका
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भाजपचे मुखपत्र ‘कमल संदेश’ने बुधवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणारे ‘ब्लॅकमेलर’ अशा तिखट शब्दात हल्ला चढविला. भारतीय लोकशाहीविरुद्ध अविश्वास निर्माण करण्याच्या षडयंत्रात गुंतलेल्या केजरीवाल यांनी त्यासाठी विदेशी पैसा वापरल्याची शक्यता व्यक्त करून केजरीवाल यांना ही सुपारी कोणी दिली याची मनमोहन सिंग सरकारने चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपचा ‘ब’ संघ अशी काँग्रेसकडून हेटाळणी केल्या जाणाऱ्या केजरीवाल यांच्याविरुद्ध भाजपने प्रथमच एवढी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दीड वर्षांपासून  भाजपने केजरीवाल यांच्या आंदोलनांचे व आरोपांचे समर्थनच केले होते. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता भाजप आणि केजरीवाल यांच्यातील सौहार्द संपुष्टात आल्याचे ‘कमल संदेश’च्या संपादकीयातून स्पष्ट झाले असून काँग्रेसप्रमाणेच भाजपही केजरीवाल यांची कोंडी करण्यासाठी सरसावला आहे.
दुसऱ्यांच्या दुर्गुणांचा पाढा वाचून केजरीवाल स्वत सत्पुरुष होऊ इच्छितात. काँग्रेसच्या रॉबर्ट वढेरा यांच्या तोंडाला काळे फासल्यानंतर केजरीवाल यांनी स्वतला निपक्ष भासविण्यासाठी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध तिखट मीठ लावून आरोप केले.  सहकाराच्या माध्यमातून चालविलेल्या उद्योगांची माहिती गडकरी भाषणांतून स्वतच देत होते. गडकरींनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, अशी प्रशस्ती देऊन कृषीमंत्री शरद पवार यांनी केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकविली. त्यामुळे केजरीवाल यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अण्णांची साथ सोडून त्यांचा विश्वासघात करणारे ब्लॅकमेलर केजरीवाल विदेशी पैशाच्या जोरावर भारतीय लोकशाहीचा खड्डा खोदण्यात गुंतले असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. एका विश्वासघातक्याला दुसऱ्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असा सवाल भाजपने केला आहे.