जगात कुठूनही.. मालवून टाक दीप! Print

वृत्तसंस्था, लंडन

जगात कुठेही बसून तुमच्या घरातला विजेचा दिवा तुम्हाला तुमच्या हातातील मोबाईलने चालू किंवा बंद करता आला तर. आता यात जरतर अशी शक्यता राहिलेली नाही. तसे करण्यात यश आले आहे. मोबाईलच्या मदतीने असा बल्ब चालू-बंद करता आला तर चोरटय़ांनाही काही प्रमाणात वचक बसू शकेल असा त्याचा फायदा आहे. या बल्बचे वैशिष्टय़ म्हणजे तो रंगीत आहे. ब्रॉडबँड नेटवर्कला तो जोडलेला असतो त्यामुळे स्मार्ट फोनच्या मदतीने तुम्ही त्या बल्बच्या प्रकाशाचे रंग बदलू शकता. प्रकाशाची तीव्रता बदलू शकता अर्थातच त्यात स्मार्टफोनचे विशिष्ट अ‍ॅप म्हणजे अ‍ॅप्लिकेशन असणे गरजेचे आहे.
हा बल्ब १७९ पौंड किमतीचा असून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त किमतीचा बल्बही घेऊ शकता, या पॅकमध्ये तुम्हाला ब्रॉडबँड कनेक्शन उपकरण व तीन बल्ब मिळतात, त्यात स्क्रू व सॉकेटही दिलेले आहेत. साधारण बल्बच्या तुलनेत हे बल्ब केवळ वीस टक्के वीज वापरतात. उत्पादकांचा असा दावा आहे, की ५० वॉटचे एलइडी बल्ब हे जगात कुठेही बसून चालू केले तर त्यामुळे चोरटे घाबरून पळून जातील. त्याच्या प्रकाशाची तीव्रता व रंगही कमीजास्त करता येतात. यात आणखी एक वेगळा फायदा असा, की प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करणे व रंग कमी-जास्त करणे या वैशिष्टय़ामुळे तुम्हाला वेगळय़ा पाश्र्वभूमीवर छायाचित्रे काढता येतात. थोडक्यात हे नेपथ्य असते.    
बल्बची वैशिष्टय़े
ब्रॉडबँडच्या मदतीने नियंत्रण.
रंगांच्या छटा, प्रकाशाची तीव्रता यावर नियंत्रण.
घरातच आकर्षक छायाचित्रे काढण्यास वेगळी प्रकाशयोजना वापरून पाश्र्वभूमी बनवणे शक्य.
नाटक कंपन्यांना त्यांच्या प्रकाशयोजनेत खूपच उपयोगी.
लाइट रेसिपी
आपल्या शरीराला योग्य होईल असा प्रकाश मिळावा यासाठीही बल्बचे सेटिंग करता येते त्यासाठी त्यात लाईट थीम्स दिलेले आहेत त्याला लाइट रेसीपीज म्हणतात. त्यातून हवा त्या रंगाचा हवा तेवढा प्रकाश तुम्ही घेऊ शकता. फिलिप्स कंपनीने हे बल्ब तयार केले असून ते अ‍ॅपल स्टोअर्समध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. तुम्ही यात शुभ्र प्रकाशाच्या अनेक छटा तयार करू शकता किंवा कुठल्याही रंगाचा प्रकाश मिळवू शकता असे फिलिप्स कंपनीने म्हटले आहे.