राहुल गांधी काँग्रेसच्या महासचिवपदी? Print

शुक्रवारी घोषणा होण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे टाळणारे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात अध्यक्ष सोनिया गांधी यांचे उत्तराधिकारी व दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून महासचिव (सेक्रेटरी जनरल) किंवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदोन्नती मिळणार आहे. येत्या रविवारी रामलीला मैदानावर किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या समर्थनार्थ काँग्रेसने भव्य मेळाव्याचे आयोजन केले असून, त्यापूर्वी राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षातील क्रमांक दोनच्या पदाची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
थेट विदेशी गुंतवणुकीवरून भाजप, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांनी चालविलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, अ. भा. काँग्रेसचे पदाधिकारी, केरळचा अपवाद वगळता काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांसह अनेक बडे नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात काँग्रेसचे भविष्यातील नेते म्हणून राहुल गांधी यांना वाजतगाजत उतरविता यावे, असा प्रयत्न चालला आहे. त्यामुळेच या मेळाव्यापूर्वी राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात औपचारिकपणे क्रमांक दोनचे पद देऊन भविष्यातील काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांच्या मते येत्या शुक्रवारीच राहुल गांधीविषयीची घोषणा होऊ शकते. रविवारच्या मेळाव्यापूर्वीचा मुहूर्त टळला तर राहुल गांधी यांच्या बढतीची घोषणा दिवाळीनंतरपर्यंत लांबणीवर पडू शकते. काँग्रेसचे सरचिटणीस व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख जनार्दन द्विवेदी यांनी या घोषणेसंबंधीची निश्चित वेळ सांगता येणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.