आंध्रात.. नेते आले हो अंगणी! Print

० राजकीय पक्षप्रमुखांच्या राज्यभर पदयात्रा
० एकच लक्ष्य, २०१४ची विधानसभा निवडणूक
पीटीआय, हैदराबाद
सरकार तुमच्या दारी.. माजी सरकार तुमच्या दारी.. भावी सरकार तुमच्या दारी.. असा अद्वितीय अनुभव सध्या तेलुगु मतदारांना येत आहे.. कारण एकच २०१४ साली होणारी विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत आपल्यालाच सत्ता मिळावी यासाठी आतापासूनच तेलुगु देसम, वायएसआर काँग्रेस आणि सत्ताधारी काँग्रेस या तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी चालवली आहे. आणि या पक्षांच्या प्रमुखांनी त्यासाठी भर दिला आहे पदयात्रेवर!
आंध्रच्या जनतेने आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या गादीवर बसवावे यासाठी आतुर असलेले तेलुगु देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी सर्वप्रथम पदयात्रेला प्रारंभ केला. २९ दिवसांत त्यांनी ५०० किमीचे अंतर पार केले असून आतापर्यंत दहा जिल्ह्य़ांतील ६५ विधानसभा मतदारसंघांचा दौरा पूर्ण केला आहे. त्यांचे लक्ष्य आणखी दोन हजार किमी चालून जाण्याचे आहे. दौऱ्याची टॅगलाइन आहे, ‘मी तुमच्यासाठी येत आहे, पुन्हा मला निवडून द्या’..!
राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याची इष्र्या बाळगून असलेले जगनमोहन रेड्डी सध्या तुरुंगात असले तरी त्यांच्या वायएसआर काँग्रेसनेही पदयात्रा आयोजित केली असून सध्या तरी त्याची धुरा जगनमोहन यांच्या भगिनी शर्मिला सांभाळत आहेत. शर्मिला यांनी १८ ऑक्टोबरपासून ही पदयात्रा सुरू केली असून आतापर्यंत ३०० किमीचे अंतर पार केले आहे. त्यांना एकंदर २७०० किमीचे अंतर पार करायचे असून भावाची जामिनावर सुटका झाली तर त्या पदयात्रेची धुरा जगनमोहन यांच्याकडे सोपवणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची टॅगलाइन आहे, ‘जगनअण्णा राजशेखरअण्णांच्या स्वप्नांची पूर्तता करतील, त्यांनाच निवडून द्या’..!
काँग्रेसशासीत या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एन. किरण रेड्डी यांनीही पदयात्रा आयोजित केली असून ‘प्रतिमासुधार’ प्रचारासाठी ही यात्रा त्यांनी आयोजित केली आहे. सरकारने आतापर्यंत अमलबजावणी केलेल्या विविध योजनांची माहिती ते या पदयात्रेद्वारे देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची टॅगलाइन आहे, ‘इंदिराम्मा बाटा’ म्हणजे इंदिरा गांधींच्या वाटेने..!
२०१४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही सर्व यातायात सुरू असताना तेलुगु देसम व काँग्रेसमधून बाहेर पडत वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सिलसिला आमदारांमध्ये सुरू आहे. मात्र, चंद्राबाबू नायडू आणि किरण रेड्डी यांना त्याचा गमपस्ताव नाही. त्यांचे म्हणणे आहे, ‘हे तर चालूच राहील. एक-दोघाच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. पक्ष मजबूतच राहील’!