दक्षिणेत ‘नीलम’वृष्टी Print

किनारपट्टीलगत वादळी वारे शाळा-महाविद्यालये बंद
पीटीआय, चेन्नई
सँडी वादळामुळे अमेरिकेतील जनजीवन कोलमडले असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीला नीलम या समुद्री चक्रीवादळामुळे धोका निर्माण झाला आहे. हे समुद्री वादळ बुधवारी संध्याकाळनंतर अधिक तीव्र झाले असून, त्यामुळे तामिळनाडू व पुडुचेरीच्या किनारी भागात मुसळधार पाऊस झाला. झोपडय़ा, उभी पिके व वीजवाहिन्यांचे यात मोठे नुकसान होऊ शकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हे चक्रीवादळ पुडुचेरी व आंध्र प्रदेशातील नेल्लोर यांच्या दरम्यान असून ते बुधवारी संध्याकाळी चेन्नईच्या जवळ पोहोचले होते. हवामान खात्याच्या ताज्या माहितीपत्रानुसार हे चक्रीवादळ आणखी तीव्र होत चालले असून, ते वायव्येकडे सरकत आहे. ते लवकरच उत्तर तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागाला ओलांडून जाईल. या दरम्यान जोरदार वाऱ्यांचा वेग ताशी ४५ ते ११० कि.मी. राहण्याची शक्यता आहे. या वादळामुळे तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावर व पुडुचेरीत २५ से.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायलसीमा या आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्याजवळ व तामिळनाडूत अनेक ठिकाणी येत्या ४८ तासांत ताशी ९०-१०० कि.मी. वेगाने वारे वाहतील.
उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी व दक्षिण आंध्र प्रदेश किनारा या ठिकाणी समुद्र खवळलेला असेल व त्यामुळे एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर व नेल्लोर जिल्ह्य़ात कमी उंचीच्या सखल प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरण्याची शक्यता आहे. प्
ाुढील ४८ तास मच्छीमारांनी खोलवर समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
चेन्नई, एन्नोर, कडलोर, नागपट्टीनम व पुडुचेरी येथे धोक्याचे बावटे लावण्यात आले आहेत. गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील बहुतांश शाळा व महाविद्यालये सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती.
जयललितांकडून आढावा
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ‘नीलम’मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला. हे वादळ किनारपट्टीवर धडकल्यास वादळग्रस्तांना कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये, अन्न-निवारा यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी या वादळग्रस्तांना तातडीने मिळाव्यात, यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. किनाऱ्यालगतच्या सर्व शाळा व महाविद्यालये गुरुवारी बंद ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.     
कल्पक्कम प्रकल्पात दक्षता
नीलम चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील कल्पक्कम अणू प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. हा प्रकल्प ताशी १६० कि.मी. वाऱ्याला तोंड देऊ शकतो. सध्या तेथील दोन्ही अणुभट्टय़ा सुरक्षित काम करीत आहेत, असे प्रकल्पाचे संचालक के. राममूर्ती यांनी सांगितले. कल्पक्कम हे किनाऱ्यावरील ठिकाण असून तुलनेने हा प्रकल्प सुरक्षित आहे.