आत्म्याचा शास्त्रीय शोध! Print

डॉ. हॅमरॉफ व रॉजर पेनरोझ यांच्या जिद्दीला यश
वृत्तसंस्था, लंडन

जेव्हा कणरूपाने बनलेला आत्मा मानवी चेतासंस्थेच्या बाहेर पडतो, तेव्हा मृत्यूसमीप अनुभवाची जाणीव होते, अशा आशयाचा क्रांतिकारी सिद्धांत डॉ. स्टुअर्ट हॅमरॉफ व रॉजर पेनरोझ दोघा ख्यातनाम वैज्ञानिकांनी मांडला आहे. मृत्यू समीप असतानाच्या अनुभवांचे आकलन मांडताना ते म्हणाले, की मेंदू हा क्वांटम संगणक आहे व सबोधता त्याची आज्ञावली आहे. अ‍ॅरिझोना विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट हॅमरॉफ यांनी क्वासी रिलीजियस सिद्धांत पुढे नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे. कणभौतिकी सिद्धांताच्या आधारे त्यांनी सबोधतेची संकल्पना अधिक समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिटनचे भौतिकशास्त्रज्ञ रॉजर पेनरोझ व डॉ हॅमरॉफ यांनी आत्म्याचे जैविक सौंदर्य उलगडताना तो मेंदूतील मायक्रोटय़ुबुल नावाच्या सूक्ष्म रचनांमध्ये अधिवास करतो असे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला आहे, की सबोधतेचा आपला अनुभव हा कण गुरुत्वाचा या मायक्रोटय़ुब्युल्सवर होणाऱ्या परिणामाचा परिपाक असतो. त्यांच्या नवीन सिद्धांताचे नाव ऑबजेक्टिव्ह रिडक्शन असे म्हटले आहे.
आत्मा म्हणजे मेंदूतील न्यूरॉन्सच्या आंतरक्रियेपेक्षाही अधिक काहीतरी असते. काळाच्या जन्मापासून ते अधिक काहीतरी अस्तित्वात आहे व ते विश्वाच्या धाग्यांनी बनलेले आहे.
सबोधता हा विश्वाचा एकात्म भाग आहे व आत्म्याच्या रूपात ती सगळीकडे अस्तित्वात आहे ही संकल्पना बौद्ध व हिंदू धर्मातील संकल्पनांसारखी आहे. पाश्चिमात्य तत्त्वज्ञानातील आदर्शवादी विवेचनातही आत्म्याच्या संकल्पनेचा असाच अर्थ लावलेला आहे. हॅमरॉफ यांच्या मते मृत्यू समीप अनुभवात मेंदूतील मायक्रोटय़ुब्युल या त्यांची क्वांटम स्थिती  गमावतात पण त्यातील माहिती नष्ट होत नाही. आत्मा केवळ शरीर सोडतो व पुन्हा विश्वात सामील होतो.
हृदय धडधडण्याचे थांबते, रक्त वाहण्याचे थांबते, मायक्रोटय़ुब्युल त्यांची क्वांटम स्थिती गमावतात. ही कणरूपी माहिती मात्र नष्ट होत नाही, ती विश्वात पुन्हा परत जाते, असे हॅमरॉफ यांनी सायन्स चॅनेलच्या ‘थ्रू द वर्महोल’ या माहितीपटात आत्म्याच्या संकल्पनेचे वैज्ञानिक रूप मांडताना सांगितले आहे.
जर एखादी व्यक्ती मरणाच्या दारात असेल व काही कारणाने ती पुन्हा वाचली तर क्वांटम स्वरूपातील माहिती पुन्हा या मायक्रोटय़ुब्युलमध्ये जाते व रुग्ण म्हणतो, की मी मृत्यू समीप अनुभव घेतला. जर तो वाचला नाही तर मरतो त्यानंतर त्याच्या मेंदूतील क्वांटम स्वरूपातील माहिती शरीराबाहेर अस्तित्वात असते, ती नष्ट होत नाही, जसा आत्मा कधीच नाश पावत नाही, असे वैज्ञानिक निरूपण त्यांनी केले आहे.