टोमॅटो, बदाम, ओट्स व मासे चाळिशीच्या स्वागतासाठी उत्तम आहार Print

वृत्तसंस्था, लंडन

वयाची चाळिशी उलटून गेल्यानंतर अनेक आजार आपल्याला बेजार करतात, त्यात हृदयरोग व मधुमेह हे प्रामुख्याने दिसून येतात. चाळिशीतही आरोग्यदायी जीवनासाठी टोमॅटो, ओट्स, बदाम तसेच मासे यांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. वयाच्या चाळिशीनंतर हृदयरोग व मधुमेह हे आजार जडतात व त्याचे कारण अनारोग्यकारक जीवनशैली हे आहे. त्यामुळे कोलेस्टरॉल व रक्तदाब वाढतो. काही विशिष्ट अन्नपदार्थामुळे मात्र आपण त्यांना आटोक्यात ठेवू शकतो. संशोधकांच्या मते रोज तीन ग्रॅम जरी ओट्स सेवन केले तरी त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण पाच ते दहा टक्क्य़ांनी कमी होते. ओट्समध्ये बिटा ग्लुकॅन असतात; जे एक प्रकारचे विद्राव्य तंतू असतात, त्यामुळे रक्तातील अनावश्यक कोलेस्टेरॉल कमी केले जाते. लो डेन्सिटी लिपोप्रोटिन म्हणजे एलडीएल प्रकारच्या कोलेस्टरॉलमुळे माणसाला हृदयरोग जडण्यास मदत होत असते, असे डेली मेलने म्हटले आहे.
एकूण कोलेस्टेरॉलपैकी एक टक्का कोलेस्टेरॉल कमी झाले तरी हृदयविकाराची शक्यता दोन टक्क्य़ांनी कमी होते. टोमॅटो हे सुद्धा अतिशय चांगले अन्न आहे. चाळिशीवरील व्यक्तींनी टोमॅटो जरूर खावेत कारण त्यात लायकोपिनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. कर्करोगाच्या पेशींची निर्मिती व प्रसार याला त्यामुळे आळा घातला जातो. त्याचबरोबर धमनीकाठिन्यापासून हृदयाचे संरक्षण केले जाते.
संशोधनात असे दिसून आले की, रोज व्यायामानंतर २० मिनिटांनी १५० मि.लि. टोमॅटो ज्यूस घेतले तर प्रॉस्टेट, फुफ्फुसे व पोटाच्या कर्करोगापासून रक्षण होते. हृदयविकारालाही अटकाव होतो. दुसऱ्या एका अभ्यासानुसार चार आठवडे रोज ६० ग्रॅम बदाम सेवन केले असता वीस प्रौढांमध्ये रक्तातील साखर ही ९ टक्क्य़ांनी कमी झाली. बदामामुळे मधुमेह व हृदयरोगापासूनही संरक्षण मिळते.
तज्ज्ञांच्या मते ‘ओमेगा ३’ या माशातील मेदामुळे हृदयविकार व रक्तदाब यांना अटकाव होतो. हृदयाचे ठोके अनियमित पडत असतील म्हणजे अरथमिया झाला असेल तरीही ओमेगा-३ मुळे फायदा होतो. सोयाबीनमधील आयसोफ्लॅव्होनमुळे कोलेस्टेरॉल कमी होते. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडांची घनता वाढते.
चेरी हा मध्यम वयात उत्तम अन्नघटक आहे. त्यामुळे गाऊट व संधिवात यांना अटकाव होतो. त्यात अँथोसायनिन हे अँटीऑक्सिडंट असतात. पूर्ण मेदाचे दूध हे स्नायूंशी निगडित विकारांवर उपयोगी ठरते. कोंबडी हा प्रथिनाचा मोठा स्रोत आहे व त्यामुळे सर्दीसारख्या विकारांना आळा बसतो. २०१० मधील अभ्यासानुसार कोंबडी सेवनाने काबरेहायड्रेटयुक्त जेवणापेक्षा फायदा होतो; परिणामी वजन नियंत्रणात ठेवता येते.    
चाळिशीतील मेन्यू
टोमॅटो- अँटीऑक्सिडंटमुळे टोमॅटोचे ज्यूस कर्करोगापासून रक्षण करते.
मासे- ओमेगा-३ मेदाम्लामुळे हृदयविकार व वाढत्या रक्तदाबाला अटकाव.
ओट्स- रोजच्या आहारात व्हाईट ओट्स हवेत, त्यामुळे वाईट कोलेस्टरॉल कमी होते. हल्ली ते  वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळते त्यामुळे अळणी लागत नाही. बदाम- रक्तातील साखर कमी होते.
सोयाबीन- कोलेस्टरॉल कमी करते, हाडांची घनता वाढते.