ओहिओत ओबामांची रोम्नी यांच्यावर किंचित आघाडी Print

पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघा आठवडा उरला असतानाच अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मिट रोम्नी यांच्यातील वादात चांगलेच रंग भरत चालले आहेत. ओहिओ या महत्त्वाच्या राज्यात झालेल्या खुल्या चर्चेत ओबामा यांनी रोम्नी यांच्यावर पाच टक्क्य़ांनी आघाडी घेतल्याचे नव्या चाचणीवरून स्पष्ट झाले आहे. विविध वृत्तवाहिन्या आणि न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या पाहणीत, रोम्नी यांनी फ्लोरिडा आणि व्हर्जिनिया येथे आघाडी घेतली असून आता तेथे दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ओहिओतील मतदारांच्या चाचणीत ओबामा यांना ५० तर रोम्नी यांना ४५ टक्के मते मिळाली आहेत. व्हर्जिनियातील ओबामांच्या आघाडीत पाच टक्क्य़ांनी घट झाली आहे.
या निवडणूक चाचणीत चुका होण्याच्या टक्केवारीचे प्रमाण अधिक अथवा उणे तीन टक्के इतके आहे. २३ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ‘सॅण्डी’चा तडाखा बसण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली. रोम्नी यांनी फ्लोरिडामध्ये गौरवर्णीय मतदारांमध्ये आघाडी घेतली आहे आणि व्हर्जिनियातही त्यांना लाभ झाला आहे. आतापर्यंत जवळपास ९५ टक्के मतदारांनी ओबामा की रोम्नी यापैकी कोणाला मत द्यावयाचे याची खूणगाठ मनाशी बांधली आहे. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्टीच्या मतदारांच्या उत्साहात फ्लोरिडामध्ये आता १६ टक्क्य़ांचा फरक असून ओबामा यांनी महिला मतदारांमध्ये दोन अंकी संख्येची आघाडी घेतली आहे.