धोका आणि सन्नाटा कायम Print

पीटीआय , न्यूयॉर्क

उद्ध्वस्त झालेली घरे.. रस्तोरस्ती पडलेला डेब्रीजचा खच.. पुराच्या पाण्यात वाहून आलेली वाहने इतस्तत पडलेली.. सरकारी निवाऱ्यात संभ्रमावस्थेत अडकलेले आपद्ग्रस्त.. हे वर्णन आहे सॅण्डी वादळामुळे उडालेल्या हाहाकाराचे, अर्थात अमेरिकेचे. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला सोमवारी सायंकाळी थडकलेल्या सॅण्डी वादळाने महासत्तेच्या निम्म्या भागाला तडाखा दिला. या तडाख्यात अब्जावधी डॉलरची वित्तहानी झाली असून अद्यापही सॅण्डीचा धोका कायम आहे! कॅरेबियन किनारा ते कॅनडा या पट्टय़ात झालेल्या या वादळाने आतापर्यंत १२२ जणांचा बळी घेतला आहे. त्यात अमेरिकेतील ५५ बळींचा समावेश आहे.

न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या दोन शहरांना सॅण्डीचा जबर तडाखा बसला असून सर्वाधिक नुकसान या दोन शहरांचेच झाले आहे.
भीतीग्रस्त अमेरिका अद्याप या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यातून सावरायची असून तब्बल पाऊण कोटी लोकांनी सोमवार आणि मंगळवारची रात्र विजेविना काढली. संपर्काची सर्व माध्यमे बंद असून अनेकांना सरकारी निवारास्थानांचा आश्रय घ्यावा लागला आहे. अनेक आपद्ग्रस्तांना वाचवण्यात पोलिसांना यश आले असले तरी बळींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. न्यूयॉर्क पोलीस दलाच्या एका पोलिसाला स्वतच्या कुटुंबाचा बचाव करताना स्वतचा जीव गमवावा लागला. अनेक निवारास्थानांमध्ये आश्रय घेतलेल्यांना आपल्या घराचे काय झाले याचा थांगपत्ताही नाही. रस्त्यावरील डेब्रीज हटवण्यासाठी पोलिसांना नागरिक उत्स्फूर्तपणे मदत करत असल्याचे चित्र न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी पहायला मिळाले.    

‘महाभयंकर’

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर हाहाकार माजवणाऱ्या सँडी वादळाचे स्वरूप अंतराळातूनही महाभंयकर दिसते आहे, असे भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळयात्री सुनीता विल्यम्स हिने सांगितले. अंतराळात चालण्याचे विक्रम करता करता तिला  या अस्मानी संकटाचे दर्शन घडले आहे. उद्या ती पुन्हा एकदा स्पेस वॉक करणार असून त्यावेळी ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील अमोनिया प्रशीतक यंत्रणेतील गळतीची दुरुस्ती करणार आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेले हे महावादळ फारच रौद्र रूपात येथूनही दिसते आहे, असे ती म्हणाली. सोमवारी आमचे अंतराळस्थानक पृथ्वीच्या अगदी जवळून गेले तेव्हा हे दर्शन घडले. वादळ खूप मोठे आहे पण तेथील सर्व जण सुरक्षित असतील, अशी आशा तिने व्यक्त केली.

ओबामांचे आवाहन
वादळाचा धोका अद्याप टळलेला नाही, तेव्हा नागरिकांनी सावधान रहावे असे आवाहन अध्यक्ष बराकओबामा यांनी केले. ओबामा बुधवारी वॉशिंग्टनमधील रेडक्रॉस सोसायटीच्या मुख्यालयात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आले. तेथे त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना तर केल्याच शिवाय आपद्ग्रस्तांना केंद्राकडूनच मदत दिली जाईल असेही जाहीर केले.