सलमान खुर्शीद यांच्या धमक्या अखेर पोकळच ! - केजरीवाल Print

alt

वृत्तसंस्था, फारुखाबाद (उत्तर प्रदेश)
मी येथे आलो असून केंद्रीय मंत्री सल्मान खुर्शीद यांचे आव्हान स्वीकारले आहे. खुर्शीद यांनी मला आणि माझ्या समर्थकांना जीवे मारण्याच्या दिलेल्या अखेर पोकळच ठरल्या आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांना येथे गुरुवारी आव्हान दिले. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चे कार्यकर्ते येथे येतील परंतु त्यांना माघारी जाणे शक्य होणार नाही, असे खुर्शीद यांनी केजरीवाल यांना अलीकडेच बजावले होते.
येथे आल्यानंतर केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली. मला येथे येण्यापासून परावृत्त करण्यासाठी काँग्रेसजनांनी मला काळे झेंडे दाखविले. परंतु मी माझ्या निश्चयावर ठाम राहिलो. मी आज रात्रीच्या गाडीने परत जाणार आहे. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, असे आव्हान केजरीवाल यांनी खुर्शीद व त्यांच्या समर्थकांना दिले. खुर्शीद आणि त्यांची पत्नी लुईसा यांनी बनावट दस्तावेज तयार केले असल्याचा आरोप करून खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केजरीवाल यांनी केला.