लांब पल्ल्याच्या गाडय़ांत ‘स्लीपर’ प्रवाशांना १ डिसेंबरपासून ओळखपत्रे सक्तीची Print

पी.टी.आय., नवी दिल्ली
‘स्लीपर’ वर्गातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना येत्या १ डिसेंबरपासून आपली छायाचित्रांकित ओळखपत्रे जवळ बाळगणे आवश्यक ठरणार आहे. अनधिकृत दलालांकडून तिकिटांच्या होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी तसेच अधिकृत प्रवाशांना प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. बनावट नावांनी तिकिटे खरेदी करून चढय़ा दराने प्रवाशांना त्यांची विक्री करणाऱ्या दलालांना या निर्णयामुळे अटकाव करता येईल, असा अंदाज आहे.
याआधी केवळ वातानुकुलित वर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच आपली ओळखपत्रे जवळ ठेवावी लागत होती. परंतु स्लीपर वर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता ओळखपत्रे जवळ ठेवावी लागतील. प्रवाशांना खात्रीपूर्वक तिकिटे मिळणे अधिक सोपे व्हावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्लीपर वर्गातून प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाशाजवळ अधिकृत ओळखपत्र असणार नाही, त्यास विनातिकीट प्रवासी समजून दंड करण्यात येणार असून रेल्वेमार्फत तसेच इंटरनेटमार्फतही तिकिटे खरेदी करणाऱ्या सर्व प्रकारच्या तिकिटांना हा निर्णय लागू होणार आहे. याखेरीज, ‘तत्काळ’ किंवा ‘इ-तिकिटे’ खरेदी करून प्रवास करणाऱ्यांनाही हा निर्णय बंधनकारक आहे.
मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, केंद्र/राज्य सरकारने दिलेले ओळखपत्र, मान्यताप्राप्त शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिलेले ओळखपत्र, आधार कार्ड, छायाचित्र असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, ‘लॅमिनेट’ छायाचित्रासह बँकांनी दिलेले क्रेडिट कार्ड अशा स्वरूपातील कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र प्रवासी आपल्याजवळ ठेवू शकतील.