कामाला लागा! Print

मनमोहन सिंग यांचे सहकाऱ्यांना आवाहन
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
यूपीए सरकारची स्पर्धा आता राजकीय ‘कॅलेंडर’शी असून, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करीत अपूर्ण कामे मार्गी लावा, त्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करा, असे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी ८० सदस्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधताना केले.
रविवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पंतप्रधानांनी आपल्या नव्या सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि मंत्रिमंडळातील तरुण व ऊर्जावान सहकाऱ्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेण्याचे निर्देश आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांना दिले. सरकारला धोरण लकव्याची लागण झाल्याचा समज दूर करणे नितांत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
धाडस आणि विश्वासाने काम केले तर आपण लक्ष्य गाठू शकतो. आपली स्पर्धा राजकीय कॅलेंडरशी आहे, पण आपण राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात गुंतलो आहे, हे विसरून चालणार नाही. आपल्या वेळेचा उपयोग अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी झाला पाहिजे. ते साध्य करण्यासाठी सरकारमध्ये सहभागी झालेल्या सर्वानी एकमेकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
यूपीए सरकारच्या प्राधान्यक्रमात अग्रक्रमावर असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्नांची आवश्यकता आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी एक हजार अब्ज डॉलरचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, ही गुंतवणूक आणण्याच्या मार्गात वित्त व इंधन पुरवठय़ाची व्यवस्था, सुरक्षा आणि पर्यावरणाच्या मंजुरीचे अडथळे असून ते दूर करणे महत्त्वाचे आहे. ऊर्जेची मागणी आणि पुरवठा यांतील  तफावत विकासात अडथळा ठरत आहे. मंदीमुळे अवघड झालेल्या जागतिक अर्थकारणासह देयकाच्या संतुलनासह वित्तीय तूट आणि चालू खात्यातील तुटीची वाढ आपल्या चिंतेचे प्रमुख कारण आहे. यावर मात करण्यासाठी सर्वसंमतीने ठोस उपाय आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.