मोदी विवाहित असल्याचा दिग्विजय यांचा जावईशोध Print

पीटीआय, सिमला
शशी थरूर यांच्या प्रेयसीबाबत टिप्पण्या करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची माहिती उघड करावी, असे आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिले आणि मोदी यांचा विवाह झाल्याचा जावईशोधही जाहीर केला.
यू टय़ूब या संकेतस्थळावर ‘नरेंद्र मोदी यांची पत्नी’ असा मजकूर टाकल्यास ‘यशोदा बेन’ ही त्यांची पत्नी असल्याची बाब पुढे येते असा जावईशोध सिंग यांनी लावला आहे. इतरांबाबत बोलणारे मोदी स्वतच्या पत्नीबाबत मौन का बाळगून असतात, असा सवाल करीत मोदी यांनी सुनंदा पुष्कर यांच्याबाबत केलेले विधान हा भारतातील सर्व स्त्रियांचा अवमान असल्याचेही दिग्विजय सिंगांनी म्हटले आहे.
मेहसाणा येथे असलेल्या आपल्या पत्नीबाबत मोदींनी उघडपणाने बोलावे, असे आव्हान अखेरीस सिंग यांनी मोदींना दिले.
गडकरींवर आरोप
काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल चढविला आहे. एकीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना तर दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिग्विजय सिंग यांनी ‘लक्ष्य’ केले.  
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना ‘स्लमडॉग मिलीनीयर’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये प्रमुख कलाकार म्हणून घ्यावे, असे उपहासाने सुचवितानाच गडकरी यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या संचालकांचे पत्ते मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये सापडतात, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.