गोव्यातील काँग्रेस खासदारांच्या पाठीवर ‘कमळ’धारी भाजपचा ‘हात’! Print

वृत्तसंस्था, पणजी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ताज्या पुनर्रचनेत गोव्यातील काँग्रेस खासदारांची उपेक्षा केली गेल्याबद्दल गोवा भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे! या घडामोडीमुळे काँग्रेस खासदारांच्या पाठिवर ‘कमळ’धारी भाजपचा ‘हात’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपचे गोव्यातील प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळाले आहे त्यापेक्षा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य असलेले शांताराम नाईक आणि खासदार फ्रान्सिस्को सारदिन्हा हे कितीतरी अधिक कर्तृत्ववान आहेत. मात्र आजवर केंद्रीय मंत्रिमंडळात गोव्यातील कुणाही खासदाराला स्थान द्यावेसे काँग्रेसला वाटलेले नाही.
विशेष म्हणजे, गोव्यातील खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी गोवा काँग्रेसच्या अधिवेशनात पणजी येथे नुकतीच झाली. त्या पाश्र्वभूमीवर मिस्किता म्हणाले की, काँग्रेसने गोव्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले असते तर गोवेकरांना अत्यंत आनंद झाला असता. पण २०१४ च्या निवडणुकीआधीच काँग्रेसने गोव्यातील खासदारकी हरण्यात जमा असल्याचे मानलेले दिसते!
संसदेत गोव्याचे तीन खासदार असून दोघे काँग्रेसचे तर एक भाजपचा आहे. शांताराम नाईक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून निष्ठावंतही आहेत. माजी मुख्यमंत्री सारदिन्हा यांनी सत्तेसाठी भाजपशीही हातमिळवणी करून स्वतंत्र गट स्थापला होता. २००९ च्या निवडणुकीच्या तोंडावर ते काँग्रेसमध्ये परतले होते आणि विजयीही झाले होते.