कॅमेरॉन यांची ब्रिटनच्या संसदेत नामुष्की! Print

वृत्तसंस्था, लंडन

युरोपीय महासंघाच्या अर्थसंकल्पात कपात करावी, या विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाच्या मागणीला सत्तारूढ हुजूर पक्षातील बंडखोरांनीही पाठिंबा दिल्याने पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचा ब्रिटिश संसदेत गुरुवारी धक्कादायक पराभव झाला. कॅमेरॉन यांचा या कपातीस विरोध होता. ठरावाच्या बाजूने ३०७ मते पडली तर विरोधात २९४ मते पडली. हा ठराव कॅमेरॉन यांच्यावर बंधनकारक नसला तरी त्यांच्यावरचा दबाव वाढला आहे. युरोपीय महासंघातील राष्ट्रनेत्यांची ब्रुसेल्स येथे परिषद होत असून त्यात २०१४ ते २०२० या कालावधीतील अर्थसंकल्पाचा निर्णय होणार आहे. मंदीच्या पाश्र्वभूमीवर ब्रिटनवासी कपात धोरणाला सामोरे जात असताना युरोपीय महासंघाच्या अर्थसंकल्पात मात्र खर्चात वाढ केली जाणार असल्याची चिन्हे असल्याने ब्रिटनमध्ये नाराजी आहे. सर्वच देशांचा खर्चवाढीला पाठिंबा असल्याने कॅमेरॉन यांनीही त्याचे समर्थन केले होते. मात्र त्याविरोधात ब्रिटनच्या संसदेत आलेल्या ठरावाला सत्तारूढ सदस्यांनीही समर्थन दिल्याने कॅमेरॉन यांची कोंडी झाली आहे.
हा ठराव बंधनकारक नसल्याने त्याचा परिणाम कॅमरॉन सरकारच्या स्थैर्यावर होणार नसला तरी संसदेतील बहुमताला धुडकावणे त्यांनाही कठीण जाणार आहे. त्यामुळे खर्चवाढीच्या प्रस्तावाविरोधात आपण नकाराधिकाराचाही वापर करू, अशी ग्वाही त्यांना द्यावी लागली आहे. यामुळे स्वदेशातील त्यांची राजकीय ताकद घटल्याचेही चित्र निर्माण झाले आहे.