निवृत्त निमलष्करी जवानांना माजी सैनिकांचा दर्जा Print

पीटीआय, नवी दिल्ली / गुरगांव

निमलष्करी दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना माजी सैनिकांचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी दिल्याने जवळपास चार लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), भारत तिबेट सीमा सुरक्षा दल (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) या दलातील माजी कर्मचाऱ्यांना संरक्षण दलाप्रमाणे माजी सैनिकांचा दर्जा देण्यात येणार असून त्यांना यापुढे माजी केंद्रीय पोलीस कर्मचारी म्हणून गणले जाणार आहे.
निमलष्करी दलाच्या माजी कर्मचाऱ्यांना माजी सैनिकांचा दर्जा देण्याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सीआयएसएफच्या कार्यक्रमात दिल्लीत जाहीर केले.
निमलष्करी दलातील कर्मचारी आपले कर्तव्य बजाविताना माजी सैनिकांप्रमाणे जिवाची बाजी लावतात, त्यामुळे त्यांना माजी सैनिकांचा दर्जा देण्यात कोणतीही अडचण नाही, असे शिंदे यांनी त्यापूर्वी गुरगांव येथे झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले.
माजी सैनिकाचा दर्जा मिळाल्याने आता या निवृत्त कर्मचाऱ्यांना शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या उपाहारगृह आणि हॉस्पिटलमध्ये सुविधाही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे हे कर्मचारी आता खासगी क्षेत्रातही नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. माजी सैनिक हे प्रशिक्षित असल्याची मान्यता असल्याने आता त्यांना खासगी नोकऱ्याही उपलब्ध होणार आहेत.
निमलष्करी दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशीही संपर्क साधणार आहे. देशात सध्या निमलष्करी दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या चार लाखांहून अधिक आहे.