हाफीज़्‍ाची मदत धुडकावली Print

पीटीआय, वॉशिंग्टन

सॅण्डीच्या धक्क्यातून सावरणाऱ्या अमेरिकेला मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याने एक कोटी डॉलर्सची मदत देऊ केली होती, मात्र अमेरिकेने ती धुडकावली. हाफीजने माणुसकीचा हवाला देत देऊ केलेली मदत म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सईद हा एक सूत्रधार होता. या हल्ल्यांत सहा अमेरिकी नागरिकांसह १६६ व्यक्ती मारल्या गेल्या होत्या. शिवाय, हाफीज सईद ज्या जमात-उद्-दावा या संघटनेचा म्होरक्या आहे, त्या संघटनेला अमेरिका तसेच संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. संकटग्रस्तांना आधार देण्याची इस्लामची श्रेष्ठ परंपरा  असली तरी हाफीज त्या परंपरेचा पाईक नाही, असे सांगत अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी ही मदत धुडकावली. बुधवारी सईदने अन्न, औषधे आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी एक कोटी डॉलर्सची मदत देऊ केली होती.