फारुखाबादमध्ये केजरीवाल कडाडले, कार्यकर्त्यांनी मात्र खाल्ला मार! Print

वृत्तसंस्था, फारुखाबाद (उत्तर प्रदेश)

मी येथे माझ्या समर्थकांसह आलो असून परराष्ट्रमंत्री सल्मान खुर्शीद यांचे आव्हान स्वीकारले आहे. खुर्शीद यांनी मला आणि माझ्या समर्थकांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमक्या अखेर पोकळच ठरल्या आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांना येथे गुरुवारी आव्हान दिले. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चे कार्यकर्ते येथे येतील परंतु त्यांना माघारी जाणे शक्य होणार नाही, असे खुर्शीद यांनी केजरीवाल यांना अलीकडेच बजावले होते. फारुखाबाद मतदारसंघातूनच खुर्शीद लोकसभेवर निवडून गेले आहेत. येथे आल्यानंतर केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली. मला येथे येण्यापासून परावृत्त करण्यासाठी काँग्रेसजनांनी मला काळे झेंडे दाखविले. परंतु मी माझ्या निश्चयावर ठाम राहिलो. मी आज रात्रीच्या गाडीने परत जाणार आहे. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, असे आव्हान केजरीवाल यांनी खुर्शीद व त्यांच्या समर्थकांना दिले. आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खुर्शीद यांना पराभूत करा, असे आवाहन केजरीवाल यांनी लोकांना केले.
 डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ने सल्मान खुर्शीद व त्यांच्या पत्नीविरोधात आघाडी उघडली आहे. खुर्शीद आणि त्यांची पत्नी लुईसा यांनी बनावट दस्तावेज तयार केले असल्याचा आरोप करून खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांचे समर्थक कुमार विश्वास यांनीही यावेळी खुर्शीद यांच्यावर टीका केली. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने काही कमी जास्त केले असेल तर त्याचा तपशील जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे. खुर्शीद दाम्पत्याने केलेल्या गैरव्यवहारांबद्दल येथील मतदारांना खुलासा हवा आहे, असे विश्वास यांनी सांगितले.
दरम्यान, केजरीवाल व खुर्शीद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये येथे काहीकाळ बाचाबाची झाली.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. ‘फार विशेष काही घडले नाही’ असे सांगत तेथील पोलीस अधीक्षकांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांना जबरदस्त मारहाण झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. केजरीवाल येथे आल्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.