काँग्रेसला लागले निवडणुकांचे वेध Print

विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली

केंद्रात यूपीए सरकारचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाला दीड वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे आतापासूनच वेध लागले आहेत. निवडणुकांना सामोरे जाण्यासाठीची बौद्धिक कवायत काँग्रेसजन यंदा दिवाळीपूर्वीच उरकणार आहेत. येत्या रविवारी रामलीला मैदानावर देशभरातील तमाम काँग्रेसजनांच्या उपस्थितीत होणाऱ्या जंगी जाहीर सभेपाठोपाठ ९ नोव्हेंबर रोजी अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री यांची हरयाणातील सूरजकुंड येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे भावी नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेत अ. भा. काँग्रेसचे पदाधिकारी, केंद्रीय मंत्री, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसच्या विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच देशभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेत विद्यमान राजकीय स्थितीचा आढावा घेणारी सोनिया गांधी, पंतप्रधान आणि राहुल गांधी यांची भाषणे होतील. ज्या रामलीला मैदानावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी रणशिंग फुंकले तिथूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
रविवारच्या जाहीर सभेपूर्वी सोनिया गांधींपाठोपाठ काँग्रेसमधील निर्विवाद क्रमांक दोनचे नेते म्हणून राहुल गांधी यांना महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ ९ नोव्हेंबर रोजी सूरजकुंड येथे अ. भा. काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रातील काँग्रेसच्या मंत्र्यांदरम्यान अनौपचारिक संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यमान राजकीय परिस्थितीव्यतिरिक्त देशापुढे असलेली आर्थिक आव्हाने आणि काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी या विषयांवर दिवसभर चर्चा होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. अ. भा. काँग्रेस समितीतील बहुप्रतीक्षित फेरबदल ९ नोव्हेंबरपूर्वी केले जातील, असाही त्याचा अर्थ काँग्रेस वर्तुळात लावला जात आहे.