तेलगू देसम पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते येरम नायडू यांचे अपघाती निधन Print

alt

हैदराबाद, २ नोव्हेंबर २०१२
तेलगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री के. येरम नायडू यांचे आज (शुक्रवार) सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील अपघातात निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. हैदराबादपासून ७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये नायडू यांची कार एका ऑईल टँकरला धडकल्याने हा अपघात झाला. ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. अपघातात नायडू गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना ताबडतोब राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. अपघातात जखमी झालेल्या अन्य चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नायडू यांच्या मागे पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. आज दुपारी श्रीकाकुलम जिल्‍ह्यातील त्‍यांच्‍या गावी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत. नायडू यांचा जन्‍म २३ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला होता. नायडू यांच्याकडे १९९६ ते १९९८ या काळात केंद्रीय ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी होती.