वैज्ञानिक अब्दुल कलाम यांना चीनमधील पेकींग विद्यापीठात शिकवण्यासाठी आमंत्रण Print

alt

बिजिंग, २ नोव्हेंबर २०१२
भारताचे माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक ए.पी.जे अब्दुल कलाम यांना चीनमधील प्रतिष्ठीत पेकींग विद्यापीठातर्फे विद्यालयात शिकवण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध करून देऊन त्यांनी विद्यार्थ्यांसोबत काम करत त्यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा पेकींग विद्यापीठाने व्यक्त केली आहे. चीन मध्ये पहिल्यांदाच अब्दुल कलाम यांनी भेट दिली होती आणि त्यावेळीचं चीन मधल्या प्रतिष्ठीत विद्यापीठाने सदर आमंत्रण दिले आहे. कलाम यांनी याबद्दल आनंदच असल्याचे म्हटले आहे. पण हे सर्व माझ्या वेळापत्रकावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिजिंग येथे शिकवण्याबद्दल अब्दुल कलाम यांना विचारले असता, मी शिक्षक आहे व अमेरिकेत प्राध्यापक म्हणून शिकवले आहे, त्यामुळे जिथे ज्ञान आहे तिथे मी जातोच. मुख्यत्वेकरून तरूण पिढीला भेटण्यास मला आवडते. त्यांच्या ज्ञानात सहभागी होणेही मला आवडते, असंही ते पुढे म्हणाले.
काल (गुरूवार ) रात्री चीनच्या पंतप्रधानांशी झालेल्या भेटीनंतर सदर भेटीचे अध्यक्ष झु शान्लु यांनी पेकींग विद्यापीठातर्फे हे आमंत्रण कलाम यांना दिले. एका वर्षासाठी कलाम यांनी त्यांच्या आवडीचा कोणताही एक विषय शिकवावा आणि त्यासाठी इच्छा असेपर्यंत चीनमध्ये रहावे असे निमंत्रण विद्यापीठामार्फत देण्यात आले आहे. तसेच कलाम यांच्या आवडीनुसार प्रयोगशाळा देखील विद्यापीठ उपलब्ध करुन देणार असल्याचे कलाम यांचे सचिव एच.शेरीडंन यांनी सांगितले.