‘१९८४च्या दंगलीला ‘शिखांचा वंशविच्छेद’ संबोधा’ Print

पीटीआय
मेलबर्न
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये भारतात शिखांविरोधात उसळलेल्या हिंसाचाराला ‘शिखांचा वंशविच्छेद’ असे संबोधले जावे अशी मागणी करणारी याचिका ऑस्ट्रेलियाच्या संसदेत गुरुवारी मांडण्यात आली. अशा प्रकारची मागणी करणारी याचिका ऑस्ट्रेलियन संसदीय इतिहासात प्रथमच मांडण्यात आली आहे, हे विशेष.ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड प्रांताचे खासदार वॉरेन एन्स्टश् यांना येथील शीख समुदायात मानाचे स्थान आहे. त्यांच्या मतदारसंघातही शिखांचे प्रमाण लक्षणीय आहे. या पाश्र्वभूमीवर एन्स्टश् यांनीच वरील याचिका संसदेत मांडली आहे. १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख जोपर्यंत केला जाईल तोपर्यंत शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे या दंगलींना ‘शिखांचा वंशविच्छेद’ असे संबोधून भारतात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आवाहन ऑस्ट्रेलियाने भारत सरकारला करावे अशी मागणी या याचिकेतून करायची असल्याचे एन्स्टश् यांनी स्पष्ट केले. त्यांनी तयार केलेल्या याचिकेवर चार हजार ४५३ शिखांच्या स्वाक्षऱ्या आहेत.