‘एक्स्प्रेस’चे माजी व्यंगचित्रकार टी. सॅम्युअल यांचे निधन Print

पीटीआय
नवी दिल्ली
‘दी इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाचे माजी व्यंगचित्रकार आणि ‘पॉकेट कार्टून’चे प्रणेते टी. सॅम्युअल यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मेरी सॅम्युअल, एक पुत्र आणि दोन कन्या असा परिवार आहे. सॅम्युअल यांचे मूळ गाव केरळमधील कोल्लम होते. स्वातंत्र्यापूर्वी लाहोर येथून प्रकाशित होणाऱ्या गॅझेटमध्ये त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. फाळणीच्या वेळी सॅम्युअल निर्वासित म्हणून दिल्लीत आले आणि त्यांनी सुप्रसिद्ध ‘शंकर्स वीकली’मध्ये काम सुरू केले.त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केले आणि तेथेच त्यांच्या ‘बाबूजी’ या ‘पॉकेट कार्टून’ला लोकप्रियता लाभली. त्यानंतर सॅम्युअल ‘दी इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्र समूहात आले आणि त्यांच्या ‘बाबूजी’ची लोकप्रियता अबाधित राहिली. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.