प्रतिभाताईंनी ‘इंटरसिटी’ची मागणी कधीच केली नव्हती Print

देवीसिंह शेखावत यांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अमरावती-नागपूर इंटरसिटी गाडी सुरू करण्याची कधीच मागणी केलेली नाही, असे पाटील यांच्या वतीने त्यांचे पती देवीसिंह शेखावत यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती-नागपूर इंटरसिटी सुरू करण्याची मागणी जुनीच आहे. आपण आमदार असताना बी. टी. देशमुख यांच्यासह या मागणीसाठी १९९१ साली स्वाक्षऱ्यांची मोहीमही राबविली होती, असे नमूद करून इंटरसिटी गाडी बंद करण्यात काही लोकांचे हितसंबंध दडले असल्याचा आरोपही शेखावत यांनी केला आहे.
अमरावती हे रेल्वेचे प्रादेशिक मुख्यालय आहे. पण सर्व रेल्वेगाडय़ांचे संचालन बडनेऱ्याहून होते म्हणून अमरावती रेल्वेस्थानक विकूनच टाकावे, असा मध्यंतरी घाट घालण्यात आला होता. अमरावतीकर नागरिकांनी तो उधळून लावला. लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी अमरावतीला आदर्श रेल्वेस्थानक बनविले. अमरावती-मुंबई ही गाडी रोज धावू लागली. अमरावतीहून तिरुपतीला जाणारी गाडीही भरगच्च असते. अमरावतीहून नागपूरला रोज जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ५० टक्के प्रकरणे अमरावती विभागातील असतात. अमरावतीहून नागपूरला १५-२० मिनिटांच्या अंतराने दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या तसेच खासगी कंपन्यांच्या सुमारे ८० बसगाडय़ा सुटतात. अशा प्रवाशांसाठी इंटरसिटी उपयुक्त ठरू शकेल. पण त्यासाठी इंटरसिटी सुटण्याची वेळ आणि स्थानकात बदल करणे आवश्यक आहे. अमरावतीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या बडनेऱ्याहून इंटरसिटी सुटण्याची वेळ सकाळी ५.३० वाजताची असून पहाटे उठून प्रवास करण्यास सहसा कोणी तयार होत नाही. पण इंटरसिटी बडनेऱ्याऐवजी अमरावतीहून सोडली आणि सकाळी ५.३० ऐवजी इंटरसिटीची वेळ सकाळी ७ किंवा ७.३० अशी केल्यास रोज सकाळी नागपूरला जाण्यासाठी  बस किंवा खासगी कारवर अवलंबून राहणाऱ्या अमरावतीकरांना गाडीने आरामात प्रवास करता येईल आणि या गाडीला भरपूर गर्दी होईल. इंटरसिटीसाठी पाच-सहा कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या लूप रेल्वेमार्गाचा अवलंब केला तर अमरावतीहून दोन ते अडीच तासात नागपूरला पोहोचणे शक्य होईल, असे शेखावत यांनी म्हटले आहे.    

दिशाहीन खुलासा
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात नेहमीच त्यांची सोबत केलेल्या देवीसिंग शेखावत यांनी त्यांच्यावतीने खुलासा करणे स्वाभाविक असले, तरी तो बातमीच्या गाभ्याला सोडून आहे. राष्ट्रपतींनी स्वत:च्या हट्टासाठी एखाद्या मंत्र्याकडे केलेली मागणी ही कधीच जाहीर असू शकत नाही, ती इतर संदर्भावरून समजून घेता येऊ शकते. आमदार असताना देवीसिंग शेखावत यांनी १९९१ साली स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली होती, अनेक लोकांचीही ती मागणी होती, तर गाडी नेमकी प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर २००८ सालीच कशी सुरू झाली?
शेखावत म्हणतात तसे मुळात अमरावती हे रेल्वेचे कुठलेही मुख्यालय नसून ते भुसावळ विभागाच्या अंतर्गत येते. बडनेरा स्थानकाचे महत्त्व आहे ते मुंबई- हावडा या मुख्य रेल्वेमार्गावर असल्यामुळे आणि ते अमरावतीला अधिक महत्त्व दिल्याने कमी होऊ शकत नाही. खुलाशात ज्या इतर गाडय़ांची उदाहरणे देण्यात आली आहेत, त्यांच्याबद्दल उल्लेखच केला नाही, कारण त्यांच्याबाबत माझे काहीच म्हणणे नसून, फक्त दरवर्षी ५ कोटी रुपयांचा तोटा सोसून चालणाऱ्या नागपूर- अमरावती या एकाच गाडीबाबत आहे.
खरेतर शेखावत यांना काही गोष्टींची प्राथमिक माहिती नसल्याचे दिसते, कारण ते म्हणतात तशी ही गाडी बडनेऱ्याहून सुटत नसून अमरावतीहूनच सुटते. या गाडीची अमरावतीहून सुटण्याची वेळ गैरसोयीची आहे, तर ती बदलण्यासाठी शेखावत यांनी आजवर आंदोलन केल्याचे माझ्या स्मरणात नाही. अमरावतीहून नागपूरसाठी दररोज किमान ८० बसगाडय़ा सुटतात हे ते स्वत:च मान्य करतात. त्यामुळे या गाडीच्या अनिवार्यतेवर प्रश्नचिन्ह आहे. अवघ्या पावणेदोनशे किलोमीटर अंतरासाठी रेल्वेगाडी चालवण्याऐवजी अकोला किंवा भुसावळसाठी इंटरसिटी चालवून प्रवाशांची सोय आणि रेल्वेची मिळकत असे दोन्ही साधता येऊ शकते.
शेखावत यांनी या मुद्याव्यतिरिक्त उपस्थित केलेले मुद्दे मला महत्त्वाचे वाटत नाहीत. मात्र प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात अमरावतीहून चार-पाच नव्या रेल्वेगाडय़ा सुरू झाल्या हा योगायोग समजला, तर नांदगाव पेठ या पंचतारांतिक औद्योगिक वसाहतीचा विकास झाला नाही किंवा कुठलाही मोठा उद्योग येथे आला नाही, हाही योगायोगच समजावा का, असा प्रश्न पडतो.
- मनोज जोशी