पगारवाढीचा आनंद असतो ‘क्षणिक’ Print

श्रीमंती आणि प्रतिष्ठेची भूक शमत नसल्याचा अभ्यासकांचा नवा सिद्धांत
पीटीआय
लंडन
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर सगळ्यांचेच डोळे बोनस, सानुग्रह अनुदाने आणि पगारवाढीकडे लागलेले आहेत. मात्र पगारवाढीने मिळणारा आनंद चिरकाल नसून ‘क्षणिक’ असतो, असे कोणी आपल्याला सांगितले, तर आपण त्यावर विश्वास ठेवू? पण नुकत्याच पुढे आलेल्या संशोधनात यात तथ्य असल्याचे आढळून आले आहे.
वाढत्या आर्थिक गरजा, आनंदाची बदलती समीकरणे यामुळे आपला आनंद पगारवाढीमध्ये शोधणाऱ्यांची संख्या आज कमी नाही. मात्र नवीन संशोधनात वेगळेच सत्य पुढे आले आहे. पगारवाढीमुळे मिळणारा आनंद हा टिकाऊ स्वरूपाचा नसतो, तर उलट तो क्षणिक असतो, असे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.
पगारवाढ झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपल्य प्रतिष्ठेची तुलना आपल्याहून अधिक श्रीमंत असलेल्यांच्या प्रतिष्ठेशी करू पाहाते. परिणामी समाधानकारक किंवा पुरेसे वेतन मिळू लागले तरी व्यक्ती चिरकाल आनंदी राहू शकत नाही. मात्र त्याच वेळी आपल्या उत्पन्नाच्या आकडय़ाबाबत समाधानी असलेल्या व्यक्तींचे जीवन तुलनेने अधिक प्रसन्न आणि शांत असते. अशा व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातही फारसे वादविवाद होत नाहीत, असे या संशोधनात आढळले आहे.
इलिनॉईस विद्यापीठाचे प्राध्यापक अमित क्रॅमर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पगाराचा नेमका समाधानकारक आकडा ठरविणे कठीण आहे, कारण ही सापेक्ष बाब आहे. मात्र आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होण्याइतपत वेतन नियमितपणे आपल्याला मिळायला हवे. अनेकदा आपल्या गरजा पूर्ण करण्याइतपत पगार आपल्याला मिळू लागला की सहकाऱ्यांच्या पगाराशी तुलना सुरू होते. मग तो पगार मिळवण्यासाठी आपण किती कष्ट केले याची तुलना होऊ लागते, त्यापुढे ‘हे’ मिळवण्याकरिता आपल्याला काय काय गमवावे लागते याची तुलना होते आणि माणूस आपला आनंद गमावू लागतो, असे प्राध्यापक अमित यांनी सांगितले.
अनेक संस्थांमध्ये पगाराइतकेच त्या पगारातून मिळणाऱ्या प्रतिष्ठेला तेथे काम करणारे कर्मचारी महत्त्व देतात, असा निष्कर्षही या संशोधनादरम्यान पुढे आला आहे.      
काय म्हणतात संशोधक?
पगारवाढ झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपल्य प्रतिष्ठेची तुलना आपल्याहून अधिक श्रीमंत असलेल्यांच्या प्रतिष्ठेशी करू पाहाते. परिणामी समाधानकारक किंवा पुरेसे वेतन मिळू लागले तरी व्यक्ती चिरकाल आनंदी राहू शकत नाही.