लिबियातील अमेरिकेचे मिशन संशयाच्या भोवऱ्यात? Print

बेनगाझी येथील अमेरिकेचे दूतावास हे सीआयएचे ‘मिशन’ असल्याची शक्यता
पीटीआय, वॉशिंग्टन
११ सप्टेंबर रोजी हल्ला झालेले बेनगाझी येथील अमेरिकेच्या राजदूतावासाचे कार्यालय हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने पुढे आणलेल्या माहितीनुसार हा राजदूतावास परराष्ट्र अधिकाऱ्यांचा नव्हे तर सीआयएच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय होते आणि त्यामुळेच दूतावासावर झालेला हल्ला हा सीआयएच्या ‘मिशन’वर झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बराक ओबामांवर ११ सप्टेंबरच्या बेनगाझी येथे झालेल्या हल्ल्याबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली गेली. या हल्ल्याच्या वेळी राजदूतावासाभोवती पुरेसे सुरक्षारक्षक का नव्हते, या हल्ल्याच्या वेळी लष्करी कुमक वेळेवर का पोहोचू शकली नाही, असे प्रश्न ओबामा यांना विचारले गेले.
मात्र, वॉल स्ट्रीटच्या वृत्तानुसार या हल्ल्यादरम्यान दूतावासातून ज्या ३० अमेरिकी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली त्यापैकी केवळ ७ जण अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याशी संबंधित होते. तसेच या हल्ल्यादरम्यान जे ४ अधिकारी मृत्युमुखी पडले त्यांच्यापैकी टायरन वूडस् आणि ग्लेन डोहर्टी हे दोघे अमेरिकेच्या नौदलातील अधिकारी असून ते सीआयएसाठी काम करीत होते. यामुळे बेनगाझी येथील अमेरिकेचे दूतावास हे सीआयएचे ‘मिशन’ असल्याच्या शक्यतेलाच पुष्टी मिळत असल्याचा दावा वॉल स्ट्रीटने केला आहे. त्यातच सीआयएचे संचालक डेव्हिड पेट्रियस हे दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेल्या ४ अधिकाऱ्यांच्या अंत्यविधीस उपस्थित न राहिल्याने अमेरिकेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र खात्रीलायक वृत्तानुसार सीआयएचे १२ गुप्तचर ‘अ‍ॅनेक्स’ नामक इमारतीत कार्यरत होते. फेब्रुवारी २०११ मध्ये लिबियाचा हुकूमशहा गड्डाफी याची सत्ता क्रांतीद्वारे उलथवून लावल्यानंतर तेथील दहशतवाद्यांचा तसेच अतिरेकी कारवायांचा सामना करण्यासाठी सीआयएने बेनगाझी येथील दूतावासात ‘मिशन’ सुरू केले होते. त्यामुळेच या कार्यालयावर झालेला हल्ला हे अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार खाते आणि सीआयए यांच्यातील सुसंवादाच्या अभावाचे फलित असावे, अशी शक्यता वॉल स्ट्रीटने वर्तविली आहे.