येरन नायडू यांचे अपघाती निधन Print

पीटीआय
श्रीकाकुलम
तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री किंजारापू येरन नायडू यांचे शुक्रवारी भीषण कार अपघातात निधन झाल़े  ते ५५ वर्षांचे होत़े.  तेलुगू देसमची राष्ट्रीय आणि इतर प्रादेशिक पक्षांशी युती घडवून आणण्यात नायडू यांनी आतापर्यंत सिंहाचा वाटा उचलला होता़.
येथील रणस्थलमजवळ शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास त्यांची कार लॉरीला धडकल्यामुळे हा अपघात झाला़  त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल़े  परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आल़े.
नायडू यांच्या आकस्मिक निधनाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया तेलुगू देसमच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े  तेलुगू देसमचे मुख्यालय असलेल्या हैदराबादेतील एनटीआर भवनावर शोककळा पसरली आह़े  ‘मी माझा उजवा हातच गमावला आहे,’ अशी भावनिक प्रतिक्रिया पक्ष प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली आह़े  ते महबूबनगर जिल्ह्यात ‘वास्तुन्ना मीकोसाम’ पदयात्रेच्या कामात व्यग्र होत़े  येरन यांच्या निधनामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान झाल्याचेही ते पुढे म्हणाल़े  आंध्र प्रदेशचे राज्यपाल ईएसएल नरसिंह, मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी आणि उपमुख्यमंत्री सी. दामोदर राजानरसिंह यांनीही येरन यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आह़े.
१९८२ साली तेलुगू देसम पक्षाची स्थापना झाल्यानंतर लगेचच येरन पक्षात सहभागी झाले होत़े  येरन १९८३ पासून आंध्र प्रदेश विधानसभेवर चार वेळा निवडून गेले होत़े  तसेच त्यांनी १९९६ नंतर लोकसभेवरही निवडून जाण्याचा धडाका लावला होता़
 १९९१ साली पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवीत असताना त्यांना ३० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला होता़  त्यानंतर श्रीकाकुलम मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीतही ते पराभूत झाले होत़े
 १९९६ ते ९८ या काळात ते केंद्रीय ग्रामविकासमंत्री होत़े  तसेच १९९८ ते २००९ या काळात लोकसभेत त्यांनी तेलुगू देसमच्या गटनेतेपदाची धुराही सांभाळली होती़.