डॉ. स्वामी यांच्या आरोपांबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे - जेटली Print

पीटीआय
सिमला
नॅशनल हेराल्ड दैनिक चालविण्यासाठी असोसिएटेड जर्नलला काँग्रेसने ९० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याबाबत पक्षाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपने शुक्रवारी केली. सदर बाब सत्य असल्यास तो कर आणि निवडणूक कायद्याचा भंग असल्याचेही भाजपने म्हटले आहे.
जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीच्या आधारे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी सांगितले की, सदर बाब सत्य असल्यास काँग्रेस पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. याबाबत काँग्रेस पक्षाकडून आपल्याला ठोस उत्तर हवे आहे, केवळ निराधार, असत्य अशा विशेषणांची अपेक्षा नाही. राहुल गांधी यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात अशी विशेषणे वापरण्यात आली असून, त्यामध्ये डॉ. स्वामी यांच्यावर बदनामीचा खटला भरण्याचेही सूतोवाच करण्यात आले आहे.
डॉ. स्वामी यांनी केलेले वक्तव्य असत्य असल्याचे काँग्रेस पक्षाचे म्हणणे असल्यास हे प्रकरणच संपुष्टात येईल. मात्र काँग्रेसचे तसे म्हणणे नसल्यास संपूर्ण प्रकरण म्हणजे मोठय़ा प्रमाणावरील बेकायदेशीर कृत्य ठरेल, असेही जेटली यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्षांना आपल्या निधीचा वापर केवळ राजकीय बाबींसाठीच करता येतो, व्यापारी अथवा आर्थिक व्यवहारांसाठी करता येत नाही, असेही जेटली म्हणाले.