राजीव हत्येबाबतची चित्रफीत दडवल्याचा आरोप नारायणन यांनी फेटाळला Print

पीटीआय
मेलबर्न
श्रीपेरूम्बदुर येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रचारसभेच्यावेळी हत्या झाली त्यावेळी त्यांची मारकेरी असलेली धनू नावाची महिला दिसत असलेली कथित चित्रफीत गुप्तचर विभाग (आयबी) प्रमुख या नात्याने काम करीत असताना दडपून टाकल्याचा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल व तत्कालीन गुप्तचर प्रमुख एम.के.नारायणन यांनी आज फेटाळून लावला आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, एका माजी सीबीआय अधिकाऱ्याने हा आरोप केला आहे व त्या व्हिडिओफितीबाबत आपल्याला काही माहिती नाही, कदाचित या अधिकाऱ्याला त्याचे पुस्तक खपावे असे वाटत असेल म्हणून हा आरोप केला असावा.
नारायणन यांनी सांगितले की, राजीव हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण स्वरूपात झाली आहे व ती संपली आहे, त्यानंतर कुणी पुस्तक लिहीत असेल व त्यात काही दावे करीत असेल तर नवीन काही नाही. ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या वतीने आयोजित एका वार्षिक परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भोजन प्रसंगी नारायणन यांनी प्रथमच या आरोपाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.    
प्रकरण काय?
राजीव हत्या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले के.रघोथमन यांनी त्यांच्या ‘कॉन्स्पिरसी टू कील- राजीव गांधी फ्रॉम सीबीआय फाइल्स’ या पुस्तकात असा दावा केला आहे की, राजीव गांधी ज्या प्रचारसभेत मारले गेले त्या सभेची एका स्थानिक व्हिडिओग्राफरने केलेली व्हिडिओफीत त्यावेळी गुप्तचर विभागाचे प्रमुख असलेले नारायणन यांनी दडपून टाकली. त्या सभेच्या आयोजकांनी या व्हिडिओग्राफरला चित्रीकरणाचे काम दिले होते. तत्कालीन खास चौकशी पथकाचे प्रमुख डी.आर.कार्तिकेयन व नारायणन यांनी त्या संदर्भात पाठपुरावा केला नाही.