भारताच्या ‘मिसाइल मॅन’ना चीनचे निमंत्रण Print

पीटीआय

बीजिंग
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन’ या नावाने ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना चीनने पेकिंग विद्यापीठात शिकविण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम सध्या आपल्या पहिल्यावहिल्या चीन दौऱ्यावर आहेत.

चिनी सरकार पुरस्कृत बीजिंग फोरम या विचारमंचाने डॉ. कलाम यांना या दौऱ्यासाठी निमंत्रित केले आहे. या दौऱ्यात डॉ. कलाम यांची पेकिंग विद्यापीठाचे अध्यक्ष झू श्ॉनलू यांच्याशी भेट झाली. या भेटीदरम्यान श्ॉनलू यांनी कलामांना विद्यापीठात शिकविण्याबद्दल विचारणा केली.
 तुम्हाला चीनमध्ये शिकविण्यासाठी जायला आवडेल का, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारला गेला असता मी शिक्षक आहे आणि मला युवकांशी संवाद साधायला आवडते, असे डॉ. कलाम म्हणाले. मी भारताबरोबरच अमेरिकेतही शिकवतो, शिवाय आपल्याजवळील ज्ञान वाटण्यासाठी मला कोठेही जायला आवडते, असे ८२ वर्षीय डॉ. कलाम यांनी सांगितले. डॉ. कलाम यांनी वर्षांतून किमान एकदा विद्यापीठात शिकविण्यासाठी यावे, अशी विनंती विद्यापीठाने केली आहे. तसेच कलामांनी आपल्याला आवडतील, योग्य वाटतील असे कोणतेही विषय येथे शिकवावेत आणि हवे तितके दिवस येथे वास्तव्य करावे, असेही त्यांना सुचविण्यात आले आहे. कलाम यांनी आपल्या इच्छेप्रमाणे एखादी प्रयोगशाळा स्थापन करावी, अशी इच्छाही झू यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. कलाम यांनी नैतिकतेचे शिक्षण देणारा स्वतंत्र विभाग सुरू केल्याबद्दल पेकिंग विद्यापीठाचे कौतुक केले. या दौऱ्यात कलाम पेकिंग विद्यापीठाला भेट देणार असून, त्यानंतर चिनी तसेच भारतीय व्यावसायिकांशी भारतीय दूतावासात संवाद साधणार आहेत.