मलालाच्या वडिलांची पाकिस्तानच्या उच्चालयात नियुक्ती? Print

रेहमान मलिक यांचा प्रतिमा वाचविण्यासाठी तोडगा

पीटीआय
इस्लामाबाद
पाकिस्तानातील किशोरावस्थेतील मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफझई हिच्या वडिलांना लंडन येथील पाकिस्तानच्या उच्चालयात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मलाला हिच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर तालिबान्यांकडून तिच्या कुटुंबीयांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन उपरोक्त नियुक्तीबाबत विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१४ वर्षीय मलाला हिच्यावर सध्या बर्मिगहॅममधील एलिझाबेथ रुग्णालयात उपचार चालू आहेत. तिचे वडील झियाउद्दीन युसुफझई आपली पत्नी आणि दोन मुलांसह सध्या लंडनमध्येच आहेत. तसेच ते ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय मिळविण्याच्या प्रयत्नांत आहेत.
त्यातून पाकिस्तानची नाचक्की होऊ नये म्हणून पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहारमंत्री रेहमान मलिक यांनी मलालाच्या वडिलांना पाकिस्तानच्या लंडन येथील उच्चालयात नोकरी देण्याची तयारी दाखविली असल्याचे समजते. या दृष्टीने मलिक यांचे पाक राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्याशी बोलणे झाले असून त्यांच्या प्रस्तावाला झरदारी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.