माझ्यावरील हल्लेखोर गांधी परिवाराशी संबंधित Print

पीटीआय, नवी दिल्ली, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यावर बूट फेकणारी व्यक्ती गांधी परिवाराशी संबंधित आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला. या आरोपाच्या पुष्टय़र्थ जगदीश शर्मा नामक या हल्लेखोराचे सोनिया गांधी व रॉबर्ट वढेरा यांच्यासोबतचे छायाचित्रही केजरीवाल यांनी प्रसृत केले.


‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या ३१ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शर्मा आणि त्याच्या दोन साथीदारांनी व्यत्यय आणला, तसेच शर्माने केजरीवाल यांच्या दिशेने बूट फेकून मारला. यामुळे या पत्रकार परिषदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. केजरीवाल यांनी शुक्रवारी जगदीश शर्मा याचे सोनिया गांधी व रॉबर्ट वढेरा यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसृत केले. ‘हा हल्लेखोर गांधी परिवाराशी जवळीक असणारा असल्याचे या छायाचित्रात स्पष्टपणे दिसत आहे.
 नेहरू-गांधी यांचा परिवार सलमान खुर्शिद यांच्यासारख्यांच्या पातळीपर्यंत घसरला आहे का, असा प्रश्नही उपस्थित करत या प्रकरणाचा तपास लागेपर्यंत भविष्यातही आमच्यावर हल्ले झाल्यास ते गांधी परिवाराच्या इशाऱ्यावरूनच होत आहेत, असे आम्ही मानू,’ असे ते म्हणाले.     
शर्माचा इन्कार
जगदीश शर्माने मात्र आपली गांधी परिवाराशी जवळीक नसल्याचे म्हटले आहे. मी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता असून सोनिया गांधी यांच्यासोबतच्या एका छायाचित्रात मी असल्याने त्यांच्या इशाऱ्यावरून मी हा हल्ला केला, असे म्हणणे चुकीचे आहे. केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साऱ्या जगासमोर आपल्या देशाची चुकीची प्रतिमा निर्माण केल्याने चीड येऊन मी हे कृत्य केले, असा दावाही त्याने केला.